खानापूर : लोंढा वन क्षेत्रामध्ये शिरोली ग्रामपंचायत सर्व्हे क्रमांक ९७ मध्ये बेकायदा ११ जातीच्या वृक्षांची दहा दिवसांपूर्वी तोड करण्यात आली. याबाबत तक्रार दाखल करण्यास वनविभागाकडून विलंब होत आहे. याप्रकरणी सरकारने उच्चस्तरीय अधिकाऱ्याची नेमणूक करून सखोल चौकशी करावी, याबाबत वनमंत्र्यांना खानापूर ब्लॉक काँग्रेसतर्फे निवेदन देऊन कारवाई करावी, अशी मागणी करणार असल्याचे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी खानापूर येथे शुक्रवारी सांगितले.
महादेव कोळी यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्ष ईश्वर घाडी म्हणाले की, शिरोली ग्रामपंचायत अंतर्गत सर्व्हे क्रमांक ९७ येथे १० एकर जागेमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी ११ जातीच्या वृक्षांची तोड करण्यात आली आहे. या ठिकाणी रस्ताही करण्यात आला आहे. या प्रकारात वनविभाग व पोलिस खात्यांच्या अधिकाऱ्यांचे संगनमत झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे तक्रार दाखल करून घेण्यास विलंब झाला आहे. अशा प्रकारे जंगलतोड होत असताना वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद वाटत आहे. गेल्या सहा महिन्यांपूर्वी वन विभागाचा दगडही काढण्यात आला आहे. दहा एकर जागेत ११ जातीच्या वृक्षांमध्ये शिसम व इतर जातीची झाडे होती. त्यांची तोड करण्यात आली आहे. या दहा एकर जागेवर कोणाच्या परवानगीने वृक्षतोड करण्यात आली, हा प्रश्न अनुत्तरीत आहे. याप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांना शोधल्याशिवाय खानापूर काँग्रेस गप्प बसणार नाही. त्यासाठी उग्र आंदोलन करण्याची ही तयारी यावेळी दर्शविण्यात आली आहे. पत्रकार परिषदेला लक्ष्मण मादर, विनायक मुतगेकर, सूर्यकांत कुलकर्णी, चंबाणा होसमणी, गुंडू टेकडी, काशीम हट्टीहोळी, ईस्कन पठाण व इतर पदाधिकारी उपस्थित होते.