फोंडा (उसगाव गोवा) : फोंडा गोवा येथे दुचाकीस्वाराची आणि कारची समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातात, दुचाकीस्वार प्रशांत (सोन्या) नागेश घाडी (मुळगांव करंबळ तालुका खानापूर) सध्या राहणार फोंडा गोवा याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सदर अपघात मंगळवार दिनांक 8 ऑक्टोबर 2024 रोजी, उसगाव (तिस्का गोवा) या ठिकाणी दुपारी 3.30 च्या सुमारास घडला आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, करंबळ येथील नागरिक नागेश घाडी हे व्यवसायानिमित्त गोवा येथे राहत असून, त्यांचा मुलगा प्रशांत उर्फ सोन्या नागेश घाडी, हा एमआरएफ कंपनीमध्ये नोकरीला होता. दि. 8 ऑक्टोंबर रोजी नेहमीप्रमाणे आपले कंपनीतील काम संपवून आपल्या मित्राच्या घरी गेला होता. त्यानंतर आपल्या घरी जात असताना, उसगाव (तिस्का, फोंडा) गोवा या ठिकाणी, त्याच्या दुचाकीची आणि कारची समोरासमोर धडक बसली आणि प्रशांत हा गंभीर जखमी झाला. तात्काळ त्याला उपचारासाठी बांबोळी गोवा येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले. परंतु उपचाराचा काहीही उपयोग न होता मंगळवारी रात्री 11.50 वाजेच्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला. धडक इतकी मोठी होती की कारची समोरील बाजू व दुचाकी चक्काचुर झाली आहे.
दरम्यान आज बुधवार दिनांक 9 ऑक्टोबर रोजी, गोवा येथे शल्यचिकित्सा करण्यात आल्यानंतर गोवा पोलिसांनी त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. त्यानंतर सायंकाळी 5:45 वाजता त्याचा मृतदेह करंबळ या मूळ गावी आणण्यात आला आहे. त्या ठिकाणी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारावेळी करंबळ व परिसरातील नागरिकांनी तसेच त्याच्या नातेवाईकांची मोठी गर्दी झाली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta