खानापूर : खानापूर-यल्लापूर राज्य महामार्गावरील कसबा नंदगड येथील होनम्मा देवी तलावात काल एका 14 वर्षीय शाळकरी मुलाचा बुडून मृत्यू झाला. या घटनेची नोंद नंदगड पोलीस ठाण्यात झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, खानापूर तालुक्यातील गरबेनहट्टी येथील गिरीश बसवराज तलवार (वय 14) असे बुडालेल्या मुलाचे नाव आहे. सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास गिरीश त्याच्या काही मित्रांसह गावापासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या होनम्मा देवी मंदिराजवळील तलावात पोहण्यासाठी गेला होता. पावसामुळे तलाव पूर्णपणे भरला आहे आणि त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने आणि पोहता येत नसल्याने त्याचा बुडून मृत्यू झाल्याचे समजते. गिरीश पाण्यात बुडाल्याची माहिती त्याच्या मित्रांनी रस्त्यावरून जाणाऱ्यांना दिली. या घटनेची माहिती गिरीशच्या कुटुंबासह परिसरात पसरली. त्यामुळे नंदगड भागातील अनेक लोक तलावावर जमले होते. नंतर सततच्या प्रयत्नानंतर सायंकाळी गिरीशचा मृतदेह सापडला. गिरीश हा नंदगड येथील महात्मा गांधी हायस्कूलमध्ये आठवीत शिकत होता. मृताच्या पश्चात आई, वडील, भाऊ व तीन बहिणी असा परिवार आहे. तो मूळचा बैलहोंगल येथील असून, तो गेल्या काही वर्षांपासून गरबेनहट्टी येथे आपल्या कुटुंबासह राहत होता. शवविच्छेदनानंतर रात्री उशिरा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
Belgaum Varta Belgaum Varta