पोलिसात तक्रार दाखल!
खानापूर : खानापूर तालुक्यातील भुरूणकी येथे अज्ञात व्यक्तींनी सरकारी शाळेचा दरवाजा तोडून शाळेत प्रवेश केला व शाळेत लावलेला श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोची मोडतोड करण्यात आली असून सदर घटना काल रविवारी 27 ऑक्टोंबर रोजी मध्यरात्री घडली असून आज 28 ऑक्टोंबर रोजी, सकाळी शाळा उघडण्याच्या वेळेला ही बाब शाळेच्या विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांना दिसून आली लागलीच ग्रामस्थ त्या ठिकाणी दाखल झाले.
यानंतर ग्रामस्थांनी, याबाबतची माहिती भाजपाचे युवा नेते व बेळगाव जिल्हा भाजपा युवा मोर्चा सेक्रेटरी पंडित ओगले व भाजपाचे माजी अध्यक्ष संजय कुबल यांना दिली. पंडित ओगले यांनी ताबडतोब नंदगड पोलिसांना याची माहिती दिली व संजय कुबल यांच्यासह भुरूणकी गावाकडे धाव घेतली.
पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपासणी केली व दुपारी एक वाजेच्या दरम्यान श्वान पथकाला बोलावून समाजकंटकांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्यात त्यांना यश आले नाही. मात्र त्या ठिकाणी उमटलेले बोटांच्या ठस्यांचे नमुने, पोलिसांनी घेतले असून ठसे तपासणीसाठी पुढं पाठविण्यात आले आहेत.
याबाबत शाळेच्या मुख्याध्यापकांची तक्रार पोलिसांनी नोंदवून घेतली असून याबाबत भाजपाचे युवा नेते पंडित ओगले व भाजपाचे नेते व माजी अध्यक्ष संजय कुबल यांनी भुरूणकी येथील सामाजिक कार्यकर्ते दत्ता पाटील यांच्यासह ग्रामस्थांच्या वतीने नंदगड पोलिसांना निवेदन देण्यात आले असून समाजकंटकावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत पुढील तपास नंदगड पोलीस करीत आहेत.