खानापूर : हलगा ग्रामपंचायत अध्यक्ष महाबळेश्वर पाटील यांच्या विरोधात बंगळुर येथील लोकायुक्त कार्यालयात तक्रार दाखल करण्यात आली असून मेरडा येथे नव्याने गटार बांधतेवेळी जुन्या गटारीसाठी वापरण्यात आलेले दगड आणि इतर साहित्य कोठे गेले याची सखोल चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
मेरडा गावामध्ये काही गटारी चांगल्या स्थितीत असताना देखील जुन्या गटारी फोडून पुन्हा नव्याने गटार बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे या कामात मोठा भ्रष्टाचार होत असल्याचे सांगत मेरडा येथील विष्णू जयवंत पाटील यांनी तालुका पंचायत अधिकाऱ्यांची भेट घेऊन हलगा ग्राम पंचायतीचे अध्यक्ष महाबळेश्वर पाटील यांच्या विरोधात लेखी तक्रार दाखल केली होती. तसेच तक्रारीमध्ये जुन्या गटारीतील दगड घेऊन गेल्याची तक्रार करीत यापूर्वीही अध्यक्षानी दगड घेऊन गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. याची दखल घेत तालुका पंचायतीच्या अधिकाऱ्यांनी या सर्व प्रकरणाची गंभीर दखल घेत दगड कोठे गेले त्याची सविस्तर माहिती घेऊन तपशील द्यावा तसेच गावामध्ये गटार काम आणि पेव्हर्स घालण्यासाठी किती खर्च करण्यात आला. याचा फलक लावण्याची सूचना देखील केली असुन 2014 ते 24 पर्यंतचे लेखापरीक्षणाचा अहवाल देखील पंचायतीला द्यावा लागणार आहे अशी सूचना केली होती मात्र हलगा ग्रामपंचायतचे पीडीओनी अद्याप कोणतीही माहिती अजूनपर्यंत विष्णू जयवंत पाटील यांना दिलेली नाही. त्यामुळे विष्णू जयवंत पाटील यांनी लोकायुक्त कार्यालय बेंगळूर येथे रीतसर तक्रार दाखल केली आहे. तसेच तक्रार दाखल करून घेण्यात आल्याची माहिती विष्णू जयवंत पाटील यांना देण्यात आली आहे. त्यामूळे हलगा ग्रामपंचायतीचे पीडीओ तक्रारीची चौकशी सुरुवात करतील का व अध्यक्ष महाबळेश्वर परशराम पाटील आपली नैतिक जबाबदारी स्वीकारून आपला राजीनामा देतील का असा प्रश्न उपस्थित झाला असून हलगा ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणाऱ्या गावात यावत जोरदार चर्चा सुरू झाली आहे.