गर्लगुंजी : खानापूर तालुक्यातील गर्लगुंजी येथे बस वेळेवर येत नसल्याने या गावातील शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत होते. शेवटी आज या गावातील विद्यार्थी – विद्यार्थिनींनी गर्लगुंजी येथे रास्ता रोको करून दोन बस अडविल्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
गर्लगुंजी या ठिकाणी सकाळी 9.30 वाजता येणारी बस 10.30 ते 11.00 वाजता येत असल्याने शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे गर्लगुंजी गावातील विद्यार्थी, विद्यार्थिनींच्याकडून आज गुरुवार दिनांक 14 नोव्हेंबर रोजी 11.00 वाजता रास्ता रोको आंदोलन करून उशिरा आलेल्या बस अडविण्यात आल्या होत्या. जवळजवळ दीड तासापेक्षा जास्त वेळ बस अडवून ठेवण्यात आल्या. यावेळी गर्लगुंजी गावचे सामाजिक कार्यकर्ते प्रसाद पाटील यांनीदेखील या आंदोलनात भाग घेऊन विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला.
शेवटी याची दखल खानापूर बस आगाराच्या अधिकाऱ्यांनी घेऊन गर्लगुंजी या ठिकाणी भेट दिली व आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनींचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रसाद पाटील यांनी आगाराच्या अधिकाऱ्यासमोर, विद्यार्थ्यांच्या समस्या मांडल्या. यावेळी डेपो अधिकाऱ्यांनी, यापुढे वेळेवर बस सोडण्यात येतील अशी ग्वाही दिली. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले.
विशेष म्हणजे आज 14 नोव्हेंबर बालदिन असल्याने आंदोलनस्थळी केक कापून बालदिन साजरा करण्यात आला..