खानापूर : खानापूर तालुक्यातील घोटगाळी-रंजनकुडी मार्गावर नागरिकांना हत्तीचे दर्शन झाले असून थोड्या वेळानंतर हत्ती रस्ता ओलांडून रस्ते शेजारी असलेल्या जाधव यांच्या शेतात शिरला. त्यावेळी शेतात भात कापणीचे काम सुरू होते. हत्तीला पाहताच रस्त्यावरून जाणाऱ्या व शेतात काम करत असणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
नागरिकांनी ताबडतोब याची माहिती घोटगाळी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिली. माहिती मिळताच घोटगाळी वन खात्याचे कर्मचारी दाखल झाले व नागरिकांच्या साहाय्याने अथक प्रयत्न करून हत्तीला परत जंगलात पिटाळले आहे. मात्र हत्ती परत आपल्या शेतामध्ये येऊन पिकांचे नुकसान करेल असे भीतीचे वातावरण, या भागातील शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाले आहे. त्यासाठी वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी या गोष्टीकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे.