नामवंत डॉक्टरांकडून तपासणी: आजपर्यंतचे सर्वात मोठे शिबिर
खानापूर : खानापूर येथील डॉक्टर असोसिएशन व सरकारी दवाखाना खानापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने रविवारी खानापूर शहरातील मारुतीनगर येथील समर्थ इंग्लीश मीडियम स्कूलमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शहर व तालुक्यातील ८०० हून अधिक रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. खानापूर शहरातील आजपर्यंतच्या इतिहासात सर्वात मोठे शिबिर पार पाडले.
शिबिराचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने आमदार विठ्ठल हलगेकर, माजी आमदार अंजली निंबाळकर, तालुका आरोग्य अधिकारी महेश किवडसन्नवर, डॉ. अनिल, बी. एल. तुक्कार आदींच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी खानापूर तालुका डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. डी. ई. नाडगौडा होते.
आमदार विठ्ठल हलगेकर यावेळी म्हणाले, डॉक्टर असोसिएशनने कोरोना काळात खानापुरात कोरोना सेंटर उभारून तब्बल १०२ लोकांवर सामाजिक बांधिलकी म्हणून उपचार केले. आजपर्यंतच्या इतिहासात आजचे आरोग्य शिबिर सर्वात मोठे शिबिर आहे. या शिबिराचा लाभ जनतेने घ्यावा.
माजी आमदार अंजली निंबाळकर म्हणाल्या, खानापुरातील रुग्णांना बेळगावला उपचारार्थ जाणे खर्चिक आहे. सदरचे शिबिर भरवून येथील रुग्णांची चांगली सोय डॉक्टर असोसिएशनने केली आहे. यावेळी अन्य मान्यवरांची भाषणे झाली. शिबिरात नामवंत डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करून त्यांना औषधे लिहून दिली. तर काहींना वेगवेगळ्या तपासणी करण्यास सांगितले. गरजूना आयुष्मान भारत स्किन नोंदणीच्या साहाय्याने ऑपरेशन करण्यात येणार असल्याचे सांगितले. नामवंत डॉक्टरांचे शिबिर खानापुरात होत असल्याने या शिबिरात मोठ्या संख्येने रुग्ण व त्यांचे नातेवाईक दाखल झाले होते. उपस्थितांचे स्वागत डॉ. वैभव पाटील व डॉ. पी. टी. पाटील यांनी केले. यावेळी खानापूर तालुक्यातील सर्व डॉक्टर व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.