खानापूर : अंगणवाडी सेविका व मदतनीस पदासाठी नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या बदल्यात उमेदवाराकडून तीस हजार रुपये घेऊन चक्क नियुक्तीचे बोगस आदेशदेखील देण्यात आले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी ब्लॉक काँग्रेसच्यावतीने करण्यात आली आहे.
हेमाडगा भागातील एका गावातील महिलेला अंगणवाडी सेविका पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तिच्या पतीकडून खानापुरातील एकाने तीस हजार रुपये घेतले. सहा महिने उलटले तरीही नियुक्तीची ऑर्डर दिली नाही. त्यामुळे
घेतलेले पैसे परत कर अन्यथा नियुक्ती आदेश दे असा तगादा त्याच्याकडे लावण्यात आला. अखेरीस त्याने एक नियुक्तीचा आदेश त्यांना दिला. तथापि प्रत्यक्षात संबंधित गावच्या अंगणवाडी केंद्रावर भलत्याच महिलेची नियुक्ती झाल्याचे कळाले. तसेच त्या व्यक्तीने दिलेला नियुक्ती आदेश बोगस असल्याचे सिद्ध झाल्याने महिलेच्या पतीने पैसे परत मागितले. तरीही संबंधित व्यक्तीने त्याला दाद दिली नाही. परिणामी आज महिलेच्या पतीने खानापूर पोलिसांत धाव घेत तक्रार देण्याची तयारी चालवली. याबाबत माहिती कळताच संबंधित व्यक्तीने त्याचे पैसे परत केल्याचे समजते. तथापि सरकारी बोगस नियुक्तीपत्र कोणी बनविले. या एकूण प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे. बनावट सरकारी शिक्के कुठे बनविले. बनावट सरकारी आदेशाची प्रत कोणी टाईप केली? या सर्व बाबींचा पोलिसांनी तपास करावा, अशी मागणी ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष ईश्वर घाडी यांनी केली आहे.