
खानापूर तालुक्यातील पाली येथील एकाला अटक
खानापूर : नुकताच झालेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस पदासाठी नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून या बदल्यात उमेदवाराकडून तीस हजार रुपये घेऊन चक्क नियुक्तीचे बनावट आदेशदेखील देण्यात आले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी ब्लॉक काँग्रेसच्या वतीने गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ग्रामीण ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष ऍड. ईश्वर घाडी यांनी केली आहे.
घाडी यांनी सांगितले, पाली येथील शीतल प्रवीण पाटील व मनाली परशराम कांबळे (रा. मळव) यांनी अंगणवाडी सेविका पदासाठी अर्ज दाखल केला होता. त्यांना आकाश अथणीकर यांनी नियुक्ती करून देतो, असे सांगून पैशाची मागणी केली. त्यासाठी प्रवीण पाटील यांच्याकडून तीस हजार रुपये घेतले. घेतलेले पैसे परत कर अन्यथा नियुक्ती आदेश दे, असा तगादा त्याच्याकडे लावण्यात आला. अखेरीस त्याने एक नियुक्तीचा आदेश त्यांना दिला. तथापि, प्रत्यक्षात संबंधित गावच्या अंगणवाडी केंद्रावर वेगळ्याच महिलेची नियुक्ती झाल्याचे समजले. तसेच त्या व्यक्तीने दिलेला नियुक्ती आदेश बनावट असल्याचे सिद्ध झाल्याने महिलेच्या पतीने पैसे परत मागितले. तरीही संबंधित व्यक्तीने त्याला दाद दिली नाही. प्रवीण पाटील यांनी यासंबंधी काँग्रेस व पोलिसांकडे तक्रार केली. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन संबंधित व्यक्ती विरोध कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेला महादेव कोळी, लक्ष्मण मादर, महातेश राऊत, सुरेश जाधव उपस्थित होते.
दरम्यान, महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनीच सुमोटो फसवणूक करणारा आकाश आथणीकर याच्यावर गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्याची हिंडलगा कारागृहात रवानगी केली आहे.

Belgaum Varta Belgaum Varta