खानापूर : खानापूर (बेळगाव) मित्र मंडळ पुणे आयोजित खानापूर, रामनगर, अळणावर, हलियाळ आणि तत्सम परिसरातल्या सीमाभागातील पुणेस्थित उद्योजकांना मार्गदर्शन मेळावा दिनांक १२ डिसेंबर २०२४ रोजी सुवासिनी मंगल कार्यालय धायरी, पुणे या ठिकाणी पार पडला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार श्री. भिमरावआण्णा तापकीर, विश्वास ग्रुपचे अध्यक्ष बाळासाहेब पोकळे, बीपीएल फौंडेशनचे अध्यक्ष श्री दत्ताराम भेकणे, केपीएल फौंडेशनचे अध्यक्ष रामू गुंडप आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. विजय पाटील हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
प्रारंभी सचिव शिवाजी जळगेकर यांनी उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक केले. मंडळातर्फे नवनिर्वाचित आमदारांचा अभिनंदनपर सत्कार करण्यात आला तसेच महाराष्ट्र शासनाच्या हिवाळी अधिवेशनात सीमाप्रश्नावर चर्चा करण्यासाठी शुभम शेळके आणि धनंजय पाटील यांच्याशी समन्वय साधून आमदारांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर प्रसिद्ध उद्योजक मार्गदर्शक श्री. भालचंद्र पुराणीक आणि श्री. केशव जावळीकर यांनी उपस्थितांना उद्योगाशी निगडित असणाऱ्या मुद्द्यांवर आणि उद्भवणाऱ्या समस्यांवर बहूमोल असे मार्गदर्शन केले.
याप्रसंगी मंडळाचे मावळते संस्थापक अध्यक्ष श्री. पीटर डिसोझा यांचा कृतज्ञतापर तर नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. विजय पाटील आणि उपाध्यक्ष श्री. सुरेश हालगी यांचा अभिनंदनपर सन्मान करण्यात आला. श्री दत्ताराम भेकणे, श्री. अतुल काकतकर, श्री. प्रशांत गुंजीकर, श्री ज्ञानेश्वर गावडे, श्री शिवाजी जळगेकर आदींनी आपले मनोगत मांडताना पीटर डिसोझा यांच्या मंडळाच्या माध्यमातून गेली ७ वर्षे केलेल्या सामाजिक कार्याचा गौरव केला तर नवनिर्वाचित अध्यक्ष आणि उपाध्यक्षांना पुढील कार्यासाठी शुभेच्छाही दिल्या.
श्री. पीटर डिसोझा यांनी आपले भावना व्यक्त करताना सांगितले की, मी जरी अध्यक्षपदावरून बाजूला झालो असलो तरी मंडळाचा एक संचालक म्हणून प्रत्येक उपक्रमांमध्ये पहिल्या इतकाच सदैव कार्यरत राहीन तर श्री. विजय पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, आम्ही डिसोझा सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवून मंडळाला नवीन उंचीवर घेऊन जाण्याचा प्रयत्न करू.
या उपक्रमात मंडळाचे सभासद असलेल्या साधारणपणे २५० उद्योजकांनी सहभाग नोंदविला होता. प्राप्त माहितीनुसार सदर उद्योजकांच्या माध्यमातून दर वर्षाला साधारणपणे रु. ५०० कोटींची उलाढाल करून शासनाला वस्तू व सेवा करापोटी रू. १०० कोटी तसेच पीएफ, इएस्आय, टीडीएस् आदीपोटी रू. ५० कोटी जमा केले जातात.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. परशराम निलजकर आणि कुमार युवराज पाटील यांनी केले तर आभारप्रदर्शन श्री. देमानी मष्णूचे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी लक्ष्मण काकतकर, बाळासाहेब देसाई, परशुराम चौगुले, रामचंद्र निलजकर, नारायण पाटील, अशोक पाटील, बाळकृष्ण पाटील, रामचंद्र बाळेकुंद्री, नारायण गावडे, पांडुरंग पाटील, राजाराम शिंदे आदी संचालकाबरोबरच अनेक सभासदांनीही अथक परिश्रम घेतले.