खानापूर : संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या हलगा व चापगाव येथील ग्राम पंचायत अध्यक्षांवर दाखल करण्यात आलेल्या अविश्वास ठरावाविरोधातील याचिका उच्च न्यायालयाने बुधवारी रद्द केली आहे त्यामुळे अविश्वास ठरावाचा घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी हलगा ग्राम पंचायतीचे अध्यक्ष महाबळेश्वर पाटील यांच्यासह चापगाव पंचायतीच्या अध्यक्षांवर अविश्वास ठराव दाखल करण्यात आला होता. तसेच अविश्वास दाखल केल्यानंतर मतदानाची तारीख जाहीर करण्यात आली होती. मात्र अविश्वासाला विरोध करीत दोन्ही पंचायतीच्या अध्यक्षांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तसेच गेल्या काही दिवसांपासून दोन्ही बाजू न्यायालयाने ऐकून घेतल्या होत्या. त्यानंतर न्यायालयाने अविश्वास विरोधात दाखल करण्यात आलेली याचिका रद्द करीत नियमाप्रमाणे अविश्वासावरील प्रक्रिया पूर्ण करावी असा आदेश दिला आहे. त्यामुळे दोन्ही पंचायतीच्या अध्यक्षांना अविश्वास ठरावाला सामोरे जावे लागणार आहे.