खानापूर : खानापूर ब्लॉक काँग्रेसतर्फे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अवमान प्रकरणी शिवस्मारकाजवळ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात “जोडे मारो” आंदोलन करण्यात आले व खानापूर ब्लॉक काँग्रेसतर्फे खानापूर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत. देशवासीयांना ते आदरणीय आहे पण मनुस्मृतीवाल्यांना संविधान संपवायचे आहे त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न चालू आहेत. त्यांचे खासदार देखील संविधान संपविण्याची उघड उघड भाषा करत असताना दिसतात. जर आपला देश व लोकशाही टिकवायची असेल तर संविधानाला पर्याय नाही हे वेळीच आपण लक्षात घेतले पाहिजे परंतु वेळोवेळी अहंकारी भाजपाने डॉ. बाबासाहेबांचा अपमान करण्याचा जणू चंगच बांधला आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. याच्या द्वेषभावनेतून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला. त्यासंदर्भात देशभरात आंदोलने होत आहेत याचाच एक भाग म्हणून आज खानापूर काँग्रेसतर्फे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचा निषेध करण्यात आला. अमित शहा यांनी ताबडतोब गृहमंत्री पदाचा राजीनामा देऊन देशाची माफी मागावी अशी मागणी ब्लॉक काँग्रेसतर्फे एका निवेदनाद्वारे करण्यात आली. सन्माननीय राष्ट्रपती यांच्याकडे सदर मागणी करण्यात आली असून हे निवेदन खानापूर तहसीलदारांना देण्यात आले आहे. यावेळी खानापूर ब्लॉक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.