खानापूर : ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ हे ब्रीदवाक्य ध्यानात ठेवून समाजातील वंचित आणि दुर्गम भागातील विद्यार्थिनींना शिक्षणाचे धडे उत्तमरीत्या गिरविण्यासाठी मराठा मंडळाचे तात्कालीन अध्यक्ष माननीय कै. नाथाजीराव हलगेकर यांच्या दूरदृष्टीकोनातून आणि स्थानिक संचालक मंडळाच्या सहकार्यातून खानापूर तालुक्यात पहिले मुलींचे कला व वाणिज्य पदवी पूर्व महाविद्यालय सन 1992 -93 मध्ये स्थापन झाले.
आज महाराणी ताराराणी या ऐतिहासिक नावाप्रमाणेच येथील विद्यार्थिनींनी शैक्षणिक क्षेत्राबरोबरच, देशसेवा, क्रीडा, कला, आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये चौफेर प्रगती साधत राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवित आहेत.
मराठा मंडळाच्या विद्यमान अध्यक्षा डॉ. राजश्रीताई नागराजू यांच्या अचूक नियोजनाखाली व या महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. अरविंद पाटील यांच्या उत्तम मार्गदर्शनाखाली कला आणि वाणिज्य विभागातून बारावीच्या परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावण्याचा बहुमान मिळवत, महाविद्यालयाची ऐतिहासिक परंपरा विद्यार्थिनींनी आजही राखून ठेवली आहे.
अशा या नावाजलेल्या महाविद्यालयातील माजी विद्यार्थिनींचा ऐतिहासिक असा भव्य मेळावा शनिवार दिनांक 28 डिसेंबर 2024 रोजी महाविद्यालयाच्या सभागृहात मोठ्या उत्साहाने संपन्न होत आहे. आज या जय्यत तयारीसाठी माजी विद्यार्थिनींची विविध कार्यकारी मंडळे, महाविद्यालयाचा प्राध्यापक वर्ग आणि कर्मचारी कंबर कसून कामाला लागले आहेत.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान मराठा मंडळाच्या कल्पक व कर्तव्यदक्ष अध्यक्षा डॉक्टर राजश्रीताई नागराजू भूषवणार आहेत. कार्यक्रमासाठी खानापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय श्री. विठ्ठल हलगेकर सर उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर संचालक श्री. शिवाजीराव पाटील व श्री. परशराम गुरव आणि प्रमुख पाहुणे म्हणून बिल्डर श्री. गोपाळराव कुकडोळकर, डॉ. संतोष पाटील, भाजी मार्केट पदाधिकारी श्री. महेश रमेशराव चव्हाण, सिव्हिल अभियंता सिध्देश मुचंडीकर, एपीएमसी व्यावसायिक श्री. चेतन अशोक पाटील व ताराराणी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. राहूल जाधव यांच्या उपस्थितीत हा भव्य दिव्य सोहळा पार पडणार आहे.
सदर सोहळ्यामध्ये आजी-माजी प्राध्यापक वर्ग इतर कर्मचारी वर्ग यांच्या सन्मानाबरोबरच दिवंगत प्राध्यापक वर्गांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार असून महाविद्यालयीन विद्यार्थिनींचा रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहे. तरी सर्व विद्यार्थिनींनी या स्नेह मेळाव्याला आवर्जून उपस्थित राहून स्नेहभाव वाढवित हा कार्यक्रम पाडण्यासाठी उपकृत करावे असे आवाहन प्राचार्य अरविंद लक्ष्मणराव पाटील व माजी विद्यार्थी संघटना पदाधिकारी शरयू कदम आणि शामल पाटील यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta