बेळगाव : खानापूर येथील क्रांती सेना को-ऑप. सोसायटी आणि समृद्धी को-ऑप. सोसायटी या दोन पतसंस्थांच्या कारभाराची चौकशी करून या दोन्ही पतसंस्थांकडून सर्वसामान्य व गरीब ठेवीदारांच्या थकीत असलेल्या ठेवी त्यांना परत मिळवून द्याव्यात, अशी मागणी खानापूर येथील श्रीराम सेना हिंदुस्थान आणि आंबेडकर युवा मंच यांनी तहसीलदारांकडे केली आहे.
श्रीराम सेना हिंदुस्थान माडीगुंजी शाखा प्रमुख पंकज सावंत आणि आंबेडकर युवा मंचचे अध्यक्ष राम मादार यांच्या नेतृत्वाखाली आज सोमवारी सकाळी उपरोक्त मागणीचे निवेदन तहसीलदारांना सादर करण्यात आले. निवेदनाचा स्वीकार करून संबंधित सोसायटीमध्ये अडकलेले ठेवीदारांचे पैसे त्यांना लवकरात लवकर परत मिळवून देण्याचे आश्वासन तहसीलदारांनी दिले.
निवेदन सादर करतेवेळी राम मादर यांनी क्रांती सेना को-ऑप. सोसायटी व समृद्धी सोसायटीकडून कशाप्रकारे सर्वसामान्य गोरगरिबांच्या ठेवी परत देण्यास टाळाटाळ केली जात आहे याची सविस्तर माहिती दिली.
क्रांती सेना को-ऑप. सोसायटीचे संस्थापक महादेव मरगाळे असून चेअरमन महादेव पाटील (संगरगाळी) व व्हा. चेअरमन रावजी बिर्जे हे आहेत. त्याचप्रमाणे समृद्धी को-ऑप. सोसायटीचे संस्थापक संजय कुबल हे असून चेअरमन हरिश्चंद्र व व्हा. चेअरमन मारुती घाडी (किरावळे) हे असल्याची माहिती देताना या दोन्ही पतसंस्थांच्या कारभाराची सखोल चौकशी केली जावी.
तसेच ठेवींच्या स्वरूपात अडकलेले ठेवीदारांचे पैसे त्यांना लवकरात लवकर सुखरूप परत मिळवून द्यावेत, अशी मागणी राम मादार यांनी केली. याप्रसंगी श्रीराम सेना हिंदुस्थान आणि आंबेडकर युवा मंचच्या कार्यकर्त्यांसह संबंधित दोन्ही पतसंस्थांचे ठेवीदार बहुसंख्येने उपस्थित होते.