
खानापूर : खानापूर-बेळगाव महामार्गावरील गणेबैल नजीक, हत्तरगुंजी गावच्या हद्दीत असलेल्या मार्गावर काल रविवार दिनांक 5 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 4.45 वाजता दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात गंभीर जखमी असलेला दुचाकी चालक विक्रम मारुती पाटील (वय 33) बादरवाडी (बेळगाव) याचा आज सोमवार दिनांक 6 जानेवारी 2025 रोजी सकाळी 6.00 वाजता उपचाराचा काही उपयोग न होता बेळगाव येथील वेणूग्राम रुग्णालयात मृत्यू झाला. तर दुचाकीच्या मागे बसलेला विक्रमचा मित्र अतुल चंद्रकांत पाटील याच्यावर वेणुग्राम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेची नोंद खानापूर पोलीस स्थानकात झाली आहे. याबाबत उत्तम मारुती पाटील बादरवाडी यांनी तक्रार नोंदविली आहे. याबाबत खानापूर पोलीस स्थानकाचे पीआय सुदर्शन पट्टणकुडी यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला व शोकाकुल वातावरणात बादरवाडी या ठिकाणी मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
अपघातात मृत्यू पावलेल्या युवकाच्या पश्चात, पत्नी, लहान मुलगी, आई, भाऊ व एक बहीण असा परिवार आहे.

Belgaum Varta Belgaum Varta