बेळगाव : खानापूर-लोंढा महामार्गावर जोमतळे गावानजीक, दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी वेगाने रस्त्या कडेला असलेल्या खड्ड्यात जाऊन पडली. त्यामुळे दुचाकी चालक युवक ठार झाला असून दुचाकीच्या पाठीमागे बसलेला युवक गंभीर जखमी झाला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नंदीहळ्ळी येथील एका मिलिटरी ट्रेनिंग अकॅडमीमध्ये मिलिटरी ट्रेनिंगचे शिक्षण घेत असलेले खानापूर तालुक्यातील मुंडवाड येथील दोघे युवक, उद्या शनिवारी व रविवारी अकॅडमीला सुट्टी असल्याने आपल्या मुंडवाड गावाकडे जात असताना खानापूर -लोंढा महामार्गावरील जोमतळे गावा नजीक दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने, दुचाकी थेट रस्त्याकडेला असलेल्या खड्ड्यात जाऊन पडली. त्यामुळे दुचाकी चालक आकाश अरुण गवाळकर (वय 23 वर्ष) व दुचाकीच्या पाठीमागे बसलेला त्याचा मित्र शिवराज विनोद जाधव (वय 23 वर्षे) हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यामुळे त्यांना उपचारासाठी 108 ॲम्बुलन्स मधून खानापूर येथील शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केली असता दुचाकी चालक आकाश अरुण गवाळकर (वय 23 वर्ष) मुंडवाड, याला मृत घोषित करण्यात आले. तर शिवराज विनोद जाधव याला गंभीर दुखापत झाल्याने, पुढील उपचारासाठी त्याला बेळगाव येथील रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
या घटनेची नोंद खानापूर पोलीस स्थानकात करण्यात येत असून, उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. सदर दुर्दैवी घटनेमुळे मुंडवाड व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta