खानापूर : खानापूर नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. निवडणूक सोमवार दि. २७ जानेवारी रोजी होणार आहे. त्याबाबतची नोटीस शुक्रवारी (दि. १७) सर्व २० नगरसेवकांना प्राप्त झाली आहे.
नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष ही दोन्ही पदे सामान्य महिलांसाठी राखीव झाल्याने नगरसेवक लक्ष्मण मादार यांनी उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने सदर याचिका फेटाळून लावली होती. त्यानुसार निवडणूक अधिकारी तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. २७ रोजी सकाळी ११ ते १ या वेळेत
इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. दुपारी २ वाजता अर्जाची छाननी आणि त्यानंतर आवश्यकता भासल्यास दुपारी तीन वाजता मतदान घेतले जाणार आहे.
आगामी दोन वर्षाच्या कालावधीसाठी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदे सामान्य महिलांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. नगर पंचायतीत ९ नगरसेविका आहेत. त्यापैकी नगराध्यक्षपदासाठी दोन आणि उपनगराध्यक्ष पदासाठी दोन नगरसेविका इच्छूक आहेत. सध्या नगरसेवकांमध्ये १४ विरुद्ध ६ असे दोन गट पडले असून हे बलाबल कायम राहणार की धक्का तंत्राचा वापर होणार हे निवडणुकी दिवशी कळणार आहे. या निवडणुकीत नगसेवकांसह स्थानिक आमदार, खासदार, विधान परिषद सदस्य यांनाही मतदानाचा अधिकार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta