खानापूर तालुका म. ए. समितीच्या वतीने हुतात्म्यांना अभिवादन
खानापूर : मराठी अस्मितेसाठी प्राण पणाला लावलेल्या हुतात्म्यांचे स्मरण करणे मराठी भाषिकांचे नित्य कर्तव्य आहे. त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी गटतट बाजूला सारुन नव्या जोमाने सीमालढ्यासाठी सिद्ध व्हा, असे आवाहन माजी आमदार दिगंबर पाटील यांनी केले.
येथील स्टेशन रोडवरील हुतात्मा नागाप्पा होसुरकर स्मारकात शुक्रवारी (दि. १७) सीमालढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. प्रारंभी तालुका म. ए. समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, माजी आमदार पाटील, प्रकाश चव्हाण, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, सरचिटणीस आबासाहेब दळवी आदींच्या हस्ते हुतात्मा नागाप्पा होसुरकर यांच्या प्रतिमेला पुष्पचक्र वाहण्यात आले.
अध्यक्ष गोपाळ देसाई म्हणाले, मध्यवर्ती म. ए. समितीच्या नेतृत्वाखाली सीमा चळवळ नेटाने लढली जात आहे. सर्वसामान्यांचा पाठिंबा हीच सीमा लढ्याची खरी ताकद आहे. ती कमी पडणार नाही याची दक्षता सगळ्यांनी घ्यावी. राष्ट्रीय पक्षांच्या आमिषांना झुगारुन समितीशी एकनिष्ठ असल्याचे दाखवून द्यावे, असे ते म्हणाले.
मौन पाळून सीमालढ्यातील हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी माजी अध्यक्ष विलास बेळगावकर, रमेश धबाले, जगन्नाथ बिर्जे, मारुती परमेकर, जयराम देसाई, वसंत नावलकर, रवींद्र शिंदे, संजीव पाटील, प्रवीण पाटील, गोपाळ पाटील, पांडुरंग सावंत, पुंडलिक कारलगेकर, रणजीत पाटील, सुनील पाटील, संतोष पाटील, अभिजीत सरदेसाई, रुक्माण्णा झुंजवाडकर, अरुण सरदेसाई, अजित पाटील, चंद्रकांत देसाई, विठ्ठल गुरव, नारायण कापोलकर, कृष्णा मन्नोळकर, मऱ्याप्पा पाटील, संजीव पाटील, राजाराम देसाई, भीमसेन करंबळकर, डी. एम. भोसले आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta