
खानापूर : मन्नूर बेळगाव येथील महिला व नागरिक, धार्मिक कार्य व पडली भरण्याच्या कार्यासाठी खानापूर येथील श्री मलप्रभा नदीला आले होते. यावेळी मन्नूर गावचा युवक समर्थ मल्लाप्पा चौगुले (वय 22) बुडाला होता. त्यामुळे त्याचा शोध घेण्याचे कार्य अग्निशामक दल व खानापूर पोलीसांनी सुरू ठेवले होते. अग्निशामक दलाचे मनोहर राठोड तसेच खानापूर पोलीस स्थानकाचे पीआय लालसाब गोवंडी, पीएसआय एम. बी. बिरादार व पोलीस कर्मचारी दुपारपासून शोध घेत होते. परंतु मृतदेह सापडत नव्हता. शेवटी हेल्पलाइन इमर्जन्सी रेस्क्यू फाउंडेशनच्या टीमने पाण्यामध्ये कॅमेरा सोडून शोध घेतला असता, सदर युवकाचा मृतदेह सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सापडला.

एचईआरएफ टीमचे प्रमुख बसवराज दुंडय्या हिरेमठ यांनी कॅमेराद्वारे मशीन मधून आपल्या सहकाऱ्यांना मृतदेह असलेल्या जागेचे लोकेशन सांगितले. त्यानंतर रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर खानापूर पोलिसांनी जागेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सरकारी रुग्णालयात पाठविला. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
बुडून मृत्यू पावलेला समर्थ चौगुले हा एकुलता एक मुलगा होता. एक वर्षांपूर्वी त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते व त्यापूर्वी त्याच्या भावाचे सुद्धा आजाराने निधन झाले होते. त्यामुळे समर्थ हा आपल्या आईचा एकुलता एक मुलगा होता. त्यामुळे समर्थच्या आईचा आक्रोश सुरू होता.

Belgaum Varta Belgaum Varta