
खानापूर : राजर्षी शाहू हायस्कूल ओलमणी येथे विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
सध्याच्या युग हे विज्ञान युग आहे, आणि अशा ह्या विज्ञान युगामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याने वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून आपली यशस्वी वाटचाल केली पाहिजे. अशा उदात्त हेतूने राजर्षी शाहू हायस्कूल ओलमणी या ठिकाणी विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले. शाळेच्या विद्यार्थिनींनी विज्ञान गीत सादर करून कार्यक्रमाला सुरुवात केली. व्यासपीठावर प्रदर्शनाचे उद्घाटक श्रीमान खंडोबा चव्हाण, उद्योजक राघोबा चव्हाण, शाळा सुधारणा मंडळाचे चेअरमन श्रीमंत तुकाराम साबळे, डॉक्टर सुरज साबळे, शाळा सुद्धा मंडळाचे सदस्य श्रीमान हनमंत जगताप उपस्थित होते. कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले तर थोर शास्त्रज्ञ सर सी. व्ही. रमण यांच्या प्रतिमेचे पूजन उद्योजक राघोबा चव्हाण यांनी केले. याप्रसंगी उपस्थित पालक वर्गांच्या शुभहस्ते रोपट्याला पाणी घालून या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. आपल्या प्रस्ताविकेतून विज्ञान शिक्षिका यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाबद्दल माहिती देऊन विद्यार्थ्यांच्या विज्ञानाबद्दल अधिक आवड कशी निर्माण करता येईल याबद्दल सांगितले.

मुख्याध्यापक सी. एस. कदम सर यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञान यांची सांगड घालून आपल्याला कसे यशस्वी होता येईल हे सांगितले. विद्यार्थ्याने विविध वैज्ञानिक प्रतिकृतींचे सादरीकरण केले जवळजवळ 90 विद्यार्थ्यांनी या विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभाग घेतला. परीक्षक म्हणून मुख्याध्यापक पांडुरंग चव्हाण, महेश साबळे सर उपस्थित होते. चेअरमन तुकाराम साबळे यांनी पालकांना संबोधित करताना विद्यार्थ्यांच्या प्रत्येक कलाकृतीला आपला सहभाग हा महत्त्वाचा आहे असे सांगितले. विद्यार्थी शिक्षक आणि पालक यांनी या वैज्ञानिक युगात एकत्रित काम करणे गरजेचे आहे असे सांगितले. उपग्रहाचे प्रक्षेपण, पवनचक्की, ग्रास कटिंग मशीन, पवन ऊर्जा, मानवी हृदय, सौरमंडळ, पाण्याचे शुद्धीकरण, अशा विज्ञान प्रतिकृती सादर केल्या.

Belgaum Varta Belgaum Varta