
खानापूर : मराठा मंडळाचे ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय नेहमीच विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासावर भर देणारे पदवीपूर्व महाविद्यालय म्हणून परिचयाचे आहे. क्रीडा क्षेत्रात नेहमीच चर्चेत असणाऱ्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सामान्य ज्ञान स्पर्धांमध्ये ही आपला नावलौकिक वाढवित असून अलिकडे या महाविद्यालयातील तेरा विद्यार्थ्यांनी भारतीय लष्करात विविध हुद्द्यावर भरती झाल्या आहेत.
मराठा मंडळाच्या अध्यक्षा डॉ. राजश्रीताई नागराजू यांच्या मार्गदर्शनाखाली, भारतीय लष्कराच्या सन्मानार्थ संपूर्ण मराठा मंडळ शिक्षण संस्था “जय हिंद” जय घोष करताना दिसते ही आम्हा भारतीयांना अभिमानास्पद गोष्ट आहे…
खानापूर तालुक्यात म्हणावी तेवढी स्पर्धा परीक्षांची जागृती नाही, हे अचूक ओळखून खेडोपाड्यातून शिक्षण घेण्यासाठी या महाविद्यालयात येणाऱ्या हुशार व होतकरू विद्यार्थ्यिनीनी स्पर्धा परीक्षांची कास धरून आपला ठसा उमटवावा व जीवन समृद्ध करावे, यासाठी इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांनींच्या निरोप समारंभाचे औचित्य साधून 2009 च्या बॅचचे आयआरएस आधिकारी, बेळगावचे जीएसटीचे अॅडिशनल कमिशनर श्री. आकाश चौगुले यांचे “स्पर्धा परीक्षा एक सुंदर ध्येय” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
या प्रसंगी बोलताना श्री. आकाश चौगुले म्हणाले की, आपलं ध्येय आपण लहान वयात निश्चित केले पाहिजे. स्वतःजवळ ध्येय नसणं म्हणजे दिशाहीन भटकून निर्थक जगणं असते. उंदराच्या स्पर्धेत सगळेच धावतात आपण इतरांपेक्षा वेगळा मार्ग अवलंबून सिंहाच्या स्पर्धेत धावलं पाहिजे. परीक्षा ही आवडीची गोष्ट कधीच नसते ती आवडीची करण्यासाठी मेहनतीचा आधार घावा लागतो एकदा मेहनत अंगवळणी पडली की परीक्षा ही आवडीची गोष्ट बनते. यु पी एस सी करणं ही कोण्या एका समुदायाची मक्तेदारी नसून जे विद्यार्थी पदवीधर आहेत ते सगळे ही परीक्षा देवू शकतात आणि आपल्या हुशारीची चुणूक दाखवू शकतात. ही परीक्षा देताना आपली शैक्षणिक टक्केवारी कुठेच आड येत नाही, त्यामुळे या परीक्षेचा गांभीर्याने विचार होणं गरजेचं आहे!
यु पी, बिहारमध्ये या परीक्षेची जागृती खूप मोठ्या प्रमाणात असून तसा या परीक्षेचा निकालही त्यांना मिळत आहेत.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सौ. प्रिया देसुरकर व श्री. अभि देसूरकर हे दांपत्य उपस्थित होते. प्रारंभी सौ. प्रिया देसूरकर यांनी ही या उपक्रमाचे कौतुक केले. मराठा मंडळाचे संचालक श्री. शिवाजीराव पाटील, ताराराणी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. राहूल जाधव हे ही या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते. स्वराज संघटनेचे अध्यक्ष श्री. निरंजन सरदेसाई यांनी या प्रसंगी या उपक्रमाचे कौतुक करीत इयत्ता बारावीच्या मुलींना खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या.
काॅलेजचे प्राचार्य श्री. अरविंद पाटील यांच्या भाषणाने कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप झाला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ प्राध्यापक श्री. एन ए पाटील यांनी केले तर या कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन प्राध्यापक टी आर जाधव यांनी केले. प्रा. सुनिता कणबरकर यांनी आभार मानून या कार्यक्रमाची सांगता केली.

Belgaum Varta Belgaum Varta