म. मं. ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी शपथबध्द…….
खानापूर : नुकताच विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा सुरू झाल्या आहेत. परीक्षा हे विद्यार्थ्याच्या बौध्दिक कौशल्यांचे मोजमाप करणारं सुंदर परिमाण आहे. परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची विविधांगी चाचणी घेतली जाते व त्यांचे मूल्यमापन केले जाते आणि दर्जात्मकतेनुसार गुण दिले जातात. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या गुणांवर आधारित त्यांची श्रेणी ठरविली जाते. ही प्रक्रिया पारदर्शक व्हावी यासाठी सरकारने अनेक उपाय योजना आखलेल्या असतात.
मराठा मंडळ शिक्षण संस्थेचे ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय खानापूर हे विद्यार्थ्यांच्या सर्वगुण संपन्नत्तेवर भर देणारे नामांकित महाविद्यालय असून या महाविद्यालयात मराठा मंडळाच्या कल्पक अध्यक्षा डॉ. राजश्रीताई नागराजू यांच्या मार्गदर्शनाखाली आजवर अनेक विधायक उपक्रम राबविले गेले आहेत.
येथील विद्यार्थिनी एक मार्च दोनहजार पंचवीस पासून सुरू होणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेला सामोरे जाणार आहेत, ही परीक्षा भयमुक्त, तणावमुक्त व्हावी यासाठी वेळोवेळी येथील विद्यार्थिंनीचे प्रबोधन करण्यात आले असून, परीक्षेत कोणत्याही अनैतिक गोष्टींचा वापर केला जाऊ नये, परीक्षेची विश्वासार्हता अबाधित राहावी, प्रामाणिकपणा व शाश्वत मुल्यांचा आदर करावा, मराठा मंडळ शिक्षण संस्थेची शिस्त व परीक्षा नियमांचे उल्लंघन होऊ नये, तसेच काॅपी सारख्या अनिष्ट पध्दतीतून संपादन केलेले यश दीर्घ काळ टिकणारे नसते हे अचूक ओळखून विद्यार्थीदशेतच आपण या गोष्टीकडे लक्ष देवून वर्षेभर शिकविलेल्या शिक्षकांचा, स्वतःचा आणि शिक्षण संस्थेचा आदर वाढवावा यासाठी येथील विद्यार्थिनीनी सामुदायिक शपथ घेऊन “काॅपी न करण्याचा” ठाम निर्णय घेऊन समस्त विद्यार्थिगणासमोर एक वेगळा आदर्श प्रस्थापित केला आहे.
काॅलेजचे प्राचार्य श्री. अरविंद लक्ष्मणराव पाटील यांनी या विधायक संकल्पाबद्दल विद्यार्थिंनींचे मनःपूर्वक कौतुक केले असून काॅलेजच्या सर्व प्राध्यापक वर्गाने विद्यार्थ्यांनीना याप्रसंगी शुभेच्छा दिल्या आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta