
पुंडलिक चव्हाण, अन्नपूर्णा चव्हाण यांना श्रद्धांजली
खानापूर : सीमासत्याग्रही पुंडलिक चव्हाण यांच्या समिती निष्ठेला आणि मराठी प्रेमाला तोड नाही. प्रदीर्घकाळ सीमा चळवळीत काम करताना त्यांनी कधीही तत्त्वांशी तडजोड केली नाही. माजी आमदार दिवंगत व्ही. वाय. चव्हाण यांच्या पत्नी आणि तालुका विकास बोर्डाच्या माजी सदस्या अन्नपूर्णा चव्हाण यांनीही सीमा चळवळीच्या कार्यात दिलेले योगदान अविस्मरणीय आहे. सीमाप्रश्नासाठी आयुष्य वेचलेल्या या दोन्ही व्यक्तिमत्त्वांच्या जाण्याने सीमा चळवळीचे नुकसान झाले आहे. सीमाप्रश्नाची सोडवणूक हीच त्यांना खरी श्रद्धांजली असल्याचे प्रतिपादन माजी आमदार दिगंबर पाटील यांनी केले.
खानापूर तालुका म. ए. समितीच्यावतीने शिवस्मारक येथे श्रीमती चव्हाण आणि पुंडलिक चव्हाण यांच्या शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
म. ए. समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई म्हणाले, शिवस्मारकाची निर्मिती होईपर्यंत माजी आमदार चव्हाण यांचे निवासस्थान हेच समितीचे कार्यालय होते. तिथे येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला आपलेपणाची वागणूक देऊन अन्नपूर्णादेवी यांनी ममत्व जपले. मुंबई आणि दिल्ली येथील सीमाप्रश्नाच्या आंदोलनात त्यांनी महिलांच्या तुकडीचे नेतृत्व केले. समिती कार्यकर्त्यांना त्यांच्या मायेचा आधार होता.
कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील म्हणाले, सीमा सत्याग्रही पुंडलिक चव्हाण यांनी चळवळीसाठी जीवन समर्पित केले होते. तरुण वयात संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात सहभागी होऊन अनेक महिने तुरुंगवास भोगला.
आबासाहेब दळवी म्हणाले, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा पहिला दिवस आणि पहिल्या आंदोलनापासून पुंडलिक चव्हाण सीमा प्रश्नाशी जोडले गेले होते. सुरुवातीच्या काळात सीमा चळवळीतील महिलांची उणीव भरून काढण्यात अन्नपूणदिवी यांचे योगदान मोलाचे ठरले.
माजी अध्यक्ष विलास बेळगावकर, सुधीर पाटील, मारुती परमेकर, अरुण सरदेसाई, श्रीकांत कदम, शंकर पाटील, यशवंत बिर्जे, राजाराम देसाई, नारायण लाड, अभिजित सरदेसाई यांनी श्रद्धांजली वाहिली.
Belgaum Varta Belgaum Varta