खानापूर : हलशीवाडी येथील लोंबकळणाऱ्या वीज वाहिन्या व धोकादायक खांबे हटवावेत अशी मागणी निवेदनाद्वारे गुरुवारी हेस्कॉमकडे करण्यात आली आहे.
हलशीवाडी येथे अनेक वर्षांपूर्वी वीज खांबे उभारून वीज वाहिन्या घालण्यात आल्या आहेत. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून वीज दुरुस्ती वाहिन्यांची दुरुस्ती करण्यात आलेली नाही त्यामुळे अनेक ठिकाणी वीज वाहिन्या खाली आल्याने अनेकदा समस्या निर्माण होत आहेत. तसेच शॉर्टसर्किट होऊन वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. याचबरोबर गावातील दोन खांबे बदलणे गरजेचे असल्याने नागरिकांनी अनेकदा हेस्कॉमकडे मागणी केली होती. तरीही त्याकडे दुर्लक्ष जात असल्याने निवेदन देऊन तातडीने काम हाती घेऊन समस्या दूर करावी अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच वेळेत काम पूर्ण झाले नाही तर वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन तक्रार दाखल करण्याचा विचार आहे देण्यात आला आहे.
हेस्कॉमचे कार्यकारी अभियंता जगदीश मोहिते यांनी निवेदनाचा स्वीकार केला तसेच विविध गावातील वीज वाहिन्या व खांब बदलण्यासाठी मोठ्या प्रमाणात अनुदानाची मागणी करण्यात आली आहे. अनुदान मिळाल्यानंतर हलशीवाडीसह तालुक्याच्या इतर गावात काम हाती घेतले जाणार आहे. सध्या हलशीवाडी येथे ज्या ठिकाणी समस्या आहे ही समस्या दूर करण्यासाठी तातडीने प्रयत्न केले जातील असे आश्वासन दिले. निवेदन देतेवेळी माजी पीकेपीएस सदस्य अनंत देसाई, राजु देसाई, वामन देसाई, मिलिंद देसाई, बंडू देसाई आदी उपस्थित होते.