
खानापूर : स्मारकाच्या जागे मध्ये बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पुढाकाराने हुतात्मा भवन उभारणी करण्यात येणार आहे. याचा भूमिपूजन सोहळा ३० मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रम संपन्न होणार आहे. प्रसिद्ध सिव्हिल इंजीनियर आणि बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष आर. एम. चौगुले यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे.
गेल्या अनेक वर्षापासून हे स्मारक उभे राहावे अशी सीमावासीयांची इच्छा होती. १९९५ साली तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पुढाकाराने हिंडलगा येथे जागा खरेदी करण्यात आली होती. जवळपास ३० वर्षे प्रतीक्षेत असणाऱ्या हुतात्मा भवनच्या कामाला अखेर २०२५ वर्षाचा पाडव्याचा मुहूर्त लागला. जणू सीमा भागातील लोकांचे एक स्वप्न पूर्ण होत असून या कार्यक्रमाला समितीचे आजी माजी लोकप्रतिनिधी, देणगीदार सर्व घटक समित्यांचे पदाधिकारी आणि सीमा भागातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. १९८६ च्या लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांच्या वारसांना देखील निमंत्रित करण्यात आले असून सीमा लढ्याचे एक प्रकारे जिवंत स्मारक उभे राहत असल्याने खानापूर तालुक्यातील समिती कार्यकर्ते, मध्यवर्ती म. ए. समिती सदस्य आणि मराठी जनतेने कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने अध्यक्ष गोपाळराव देसाई, माजी आमदार दिगंबरराव पाटील, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील व निरंजन सरदेसाई, आणि सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta