खानापूर : बेळगावमधील खानापूर तालुक्यात दगडाने ठेचून करण्यात आलेल्या भीषण हत्येप्रकरणी पोलिसांनी शिवमोग्गा मधून एका आरोपीला अटक केली आहे. बलोगा, तालुका खानापूर येथील शिवनगौडा इरनगौडा पाटील (वय ४७) या इसमाची दगडाने ठेचून निर्दयीपणे हत्या करण्यात आली होती. सदर व्यक्तीचा मृतदेह खानापूर ते एम. के. हुबळी रस्त्यावरील गडीकोप गावानजीक असणाऱ्या शेतात आढळून आला होता. याप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करत अवघ्या २४ तासात आरोपीला शिवमोग्गामध्ये अटक केली आहे, अशी माहिती जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी दिली. अटक करण्यात आलेल्या आरोपीने कबुली दिली असून शिवनगौडा पाटील यांना त्यांच्या घरातून बोलावून घेऊन जात त्यांच्यासोबत मद्यपान व जेवण करून शेतात नेऊन त्यानंतर त्यांची निर्घृण हत्या केल्याचे पोलीस चौकशीत सांगितले आहे. आरोपीला न्यायालयात हजर करून पुढील चौकशीसाठी पोलिस कोठडीत रवानगी करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलिसप्रमुखांनी दिली.