
खानापूर : गेल्या सात महिन्यापासून बेपत्ता असलेले झाडअंकले येथील रहिवासी मारुती उसुरलकर (वय वर्षे 75) यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत भूतनाथ येथील डोंगरावर सांगाड्याच्या स्वरूपात सापडला आहे. मृतदेहाची प्राथमिक ओळख त्यांच्या मृतदेह शेजारी असलेल्या चप्पल, छत्री व गळ्यातील वारकरी माळ यावरून पटविण्यात आली आहे. मात्र सरकारी नियमाप्रमाणे डीएनए परीक्षण करण्यासाठी सदर सांगाडा प्रयोग शाळेला पाठविण्यात येणार आहे. झाडअंकले येथील रहिवासी मारुती उसूलकर हे मागील सात महिन्यांपासून बेपत्ता होते. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा बराच शोध घेतला परंतु ते सापडू शकले नाहीत. मानसिक दृष्ट्या अस्वस्थ असलेले मारुती उसूलकर यांचा मृतदेह तब्बल सात महिन्यानंतर भूतनाथ डोंगरावर पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांच्या नजरेस गळफास घेतलेल्या अवस्थेत सांगाड्याच्या स्वरूपात दिसून आला. त्यानंतर ही बातमी सर्वत्र पसरली. सदर बातमी उसुलकर यांच्या कुटुंबीयांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली व मृतदेहाच्या देहयष्टीवरून तसेच गळ्यातील वारकरी माळ व चप्पल यावरून सदर मृतदेह उसूलकर यांचाच असल्याची खात्री त्यांच्या कुटुंबीयांनी केली पण सदर मृतदेहाचा सांगाडा मारुती उसुलकर यांचाच आहे का याची खात्री करण्यासाठी नियमाप्रमाणे सदर सांगाडा प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे. सध्या हा मृतदेहाचा सांगाडा खानापूर पोलीस स्थानकात ठेवण्यात आला असून लवकरच परीक्षण करण्यासाठी शाळेत पाठविण्यात येणार असल्याचे समजते.
Belgaum Varta Belgaum Varta