
खानापूर : गेल्या दोन दिवसांपूर्वी बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात बलोगा गावात घडलेल्या खून प्रकरणी वेगळीच कलाटणी मिळाली असून पत्नीने प्रियकराच्या मदतीने आपल्या पतीचा निर्घृण खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न आले आहे.
बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील बलोगा गावात दोन दिवसांपूर्वी एका शेतात मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी २४ तासात पोलिसांनी आरोपीला अटक केली होती. अटक करण्यात आलेल्या आरोपीने खुनामागचे कारण स्पष्ट करत या मागे मृत व्यक्तीची पत्नी आणि आपले अनैतिक संबंध असल्याचे त्याने कबूल केले.
मृत शिवनगौडा पाटील यांची पत्नी शैला पाटील हिचे रुद्रप्पा शिवपुत्र होसट्टी (रा. बिडी) या इसमाशी अनेक वर्षांपासून अनैतिक संबंध होते. याची माहिती मिळताच शिवनगौडा याने पत्नीला जाब विचारायला सुरुवात केली. या कारणामुळे तणाव वाढत गेला आणि अखेर या दोघांनी मिळून शिवनगौडाचा काटा काढण्याचा कट रचला. बलोगा ते पारिश्वाड रस्त्यावर शिवनगौडाला पार्टीसाठी घेऊन गेले आणि तिथे दगडाने ठेचून त्याचा खून केला. खून केल्यानंतर रुद्रप्पा घटनास्थळावरून फरार झाला होता. मात्र पोलिसांनी त्याचा कलबुर्गी येथे शोध लावून अटक करून हिंडलगा कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. याप्रकरणी शिवनगौडाची पत्नी शैलालाही अटक करण्यात आली असून, खानापूर पोलिसांनी तिची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.