
खानापूर : कारलगा पंचक्रोशीतील श्री संत एकनाथ भारुड भजनी मंडळ हे गेले सहा दशकावून अधिक काळ भारुडाच्या माध्यमातून मराठी भाषा कला व संस्कृतीचे जतन करीत आहे. 1972 साली स्थापन झालेल्या या मंडळाचे कार्य आजतागायत निरंतर चालू आहे. खानापूर तालुक्यात खेडोपाडी भजनी भारुडाचे सादरीकरण करत समाज प्रबोधनाचे काम या भजनी भारुड मंडळाने केले आहे. 2023 साली सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी काही तरुण युवकांनी पुढाकार घेत दारुड्या माणसाचे जीवन कसे असते व त्याच्या संसाराची दारुमुळे कशी धूळधाण होते व दारुड्याचा शेवट कसा होतो याचे सादरीकरण करणारा एक प्रयोग साकारला होता. हा प्रयोग इतका यशस्वी झाला की गोवा, महाराष्ट्र तसेच कर्नाटक या तिन्ही राज्यांमध्ये तो गाजला आणि एक वर्षाच्या आत या मंडळाने 100 हून अधिक प्रयोग सादर श्री संत एकनाथ भारुड भजनी मंडळ नावारूपास आणले त्याचीच पोचपावती म्हणून श्री संत एकनाथ भारुड भजनी मंडळाला यावर्षीचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. ही बातमी कारलगा पंचक्रोशीत समजतात सर्वत्र उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे व या प्रयोगातील कलाकारांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. भारतामध्ये विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना गौरविण्यासाठी राष्ट्रीय पुरस्काराची योजना आहे. या पुरस्कारामुळे लोकांमध्ये चांगल्या कामाची प्रेरणा निर्माण होते आणि समाजाला एक नवीन दिशा मिळते. भजनी मंडळ त्यापैकी एक महत्त्वपूर्ण क्षेत्र आहे जिथे कला संगीत आणि सामाजिक बांधिलकी जपत काम केले जाते. सदर भजनी मंडळातील या प्रयोगात दारुड्याची भूमिका अजरामर करणारे रणजीत पाटील व पार्श्वगाय गणपतराव पाटील या तरुणांनी या मंडळाची धुरा यशस्वीरित्या सांभाळली आहे. या भजनी भारुड मंडळात 35 ते 40 कलाकार आहेत जे मनोरंजना बरोबरच समाजप्रबोधनाचे काम देखील करीत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta