बेळगाव : सायबर गुन्हेगारांनी व्हिडीओ कॉलवरून लाखो रुपये उकळलेल्यावरून बिडी येथील वृद्ध दाम्पत्याने आत्महत्या केल्याप्रकरणी छडा लावण्यात नंदगड पोलिसांना यश आले असून गुजरात राज्यातील सुरतमधून एकाला ताब्यात घेतले आहे.
गुजरातमधील सुरत येथील चिराग जीवराजबाई लक्कड याला अटक केली आहे. त्याला नंदगड पोलिस स्टेशन गुन्हा क्र. 32/2025 अंतर्गत आयटी कायद्याच्या कलम 66(ड) आणि बीएनएसच्या कलम 3(5) सह कलम 108, 308(2), 319(2) अन्वये अटक करण्यात आली.
आत्महत्या केलेल्या वृद्धाने एसबीआय बँकेतून 6,10,000/- लाख रुपये आयडीएफसी बँकेच्या बालाजी इंडस्ट्रीजच्या नावावरील खात्यात ऑनलाइन हस्तांतरित करण्यात आले होते. चिरागने त्याच्याकडे असलेल्या मोबाईल फोनवर या बँक खात्याशी जोडलेल्या मोबाईल क्रमांकाचा वापर करून वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर केले. या फसवणुकीमुळे निराश झालेले रेल्वे निवृत्त कर्मचारी डिएगो नझरेथ (83) आणि त्यांची पत्नी पाविया नझरेथ (79) या वृद्ध दाम्पत्याने आत्महत्या केली होती.
नंदगड पोलिसांनी या सदर आरोपीला आज दि. 14/04/2025 रोजी अटक करून त्याच्याकडून हस्तांतरित करण्यासाठी वापरलेले दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले आणि आरोपीला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.