
खानापूर : खानापूर-परीश्वाड मार्गावरील कुप्पगिरी क्रॉसजवळ शांतिनिकेतन शाळेनजीक दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक होऊन 17 वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला तर दुसरा दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला असून सदर घटना आज सोमवार दिनांक 5 मे 2025 रोजी सकाळी 8.15 वाजेच्या सुमारास घडली आहे. अपघातात मृत्यू झालेल्या दुर्दैवी दुचाकीस्वाराचे नाव संजय वैजनाथ येळ्ळूर (वय 17) मूळ गाव मुन्नोळी, सध्या राहणार देवलती असे आहे. तर अपघातात किरकोळ जखमी झालेल्या दुसऱ्या दुचाकीस्वाराचे नाव विठ्ठल नारायण महाजन (वय 30) राहणार नागुर्डा असे आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, देवलत्ती येथील संजय वैजनाथ येळ्ळूर या युवकाचे वडील लहानपणीच वारल्याने तो त्याच्या मामाच्या गावी देवलत्ती येथेच रहायचा. सदर युवक नंदगड येथील पदवीपूर्व विद्यालयात बारावीचे शिक्षण घेत होता. आज सोमवारी सकाळी आपल्या मित्राला आणण्यासाठी खानापूरकडे जात असताना त्याच्या दुचाकीची व खानापूरहून परीश्वाडकडे जाणाऱ्या नागुर्डा गावच्या युवकाच्या दुचाकीची समोरासमोर धडक बसल्याने, हा अपघात झाला आहे. अपघात होताच गंभीर जखमी असलेल्या संजय येळ्ळूरला तात्काळ खानापूरच्या शासकीय दवाखान्यात उपचारासाठी आणण्यात आले. परंतु त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित करण्यात आले. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. खानापूर पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta