
खानापूर : खानापूर येथे मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानद्वारे उभारण्यात आलेल्या प्रबोधनकार ठाकरे वाचनालयाचा उद्घाटन समारंभ गुरुवार, दिनांक १५ मे २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता श्री राजा शिवछत्रपती स्मारक येथे मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. मराठी साहित्य, भाषा आणि वाचन संस्कृतीच्या संवर्धनासाठी हे वाचनालय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
या वाचनालयाचे उद्घाटन महाराष्ट्राचे माजी उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. श्री. सुभाष देसाई यांच्या शुभहस्ते होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. नारायण य. कापोलकर असणार आहेत. तसेच, मुंबई विद्यापीठातील राजशास्त्र विभागप्रमुख डॉ. दीपक पवार प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
या महत्त्वपूर्ण सोहळ्याला आमदार श्री. विठ्ठल सो. हलगेकर, माजी आमदार श्री. दिगंबरराव पाटील, श्री. अरविंद पाटील, डॉ. सौ. अंजलीताई निंबाळकर यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. शिक्षण, सामाजिक आणि वाचन चळवळीतील प्रतिष्ठित व्यक्तींची देखील या कार्यक्रमाला शोभा असेल.
यावेळी सीमा सत्याग्रही श्री. शंकरमामा पाटील आणि श्री. नारायणराव लाड यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानने आयोजित केलेला हा कार्यक्रम वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल आहे.
आयोजकांनी खानापूर आणि परिसरातील सर्व मराठीप्रेमी वाचक, विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि शाळा सुधारणा समितीच्या सदस्यांना या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहण्याचे नम्र आवाहन केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta