
खानापूर : खानापूर तालुक्यातील शेतकरी वर्गाला आवश्यक त्या खतांचा पुरवठा वेळेत आणि योग्य दरात करण्यात यावा यासाठी शिवस्वराज फाऊंडेशन आक्रमक. खानापूर तालुक्यात मान्सूनला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांची पेरणीसाठी व उसाला खते घालण्यासाठी घाई गडबड सुरू आहे. अशा काळात तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकाला आवश्यक असलेले खत उपलब्ध होत नसल्याने कामे खोळंबताना दिसत आहेत. जिकडे तिकडे आवश्यक त्या खताचा तुटवडा झालेला आहे. खानापूर तालुक्यातील खत विक्रेते, पीकेपीएस् सोसायटी वा शासन नियुक्त अन्य वितरक किंवा पुरवठादार यांच्याकडून खते मिळेनाशी झाली आहेत. शेतकऱ्यांना विशेषतः युरिया खताची अधिक गरज असते, अशावेळी खत वितरक आणि विक्रेते युरिया खतासोबत गोळी-खत देखील घ्यावे अशी अट घालत आहेत. यात एक पोते युरिया खतासोबत दोन पोती गोळी-खत घेणे अनिवार्य असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाला याचा फटका बसत आहे. युरिया खतासाठी त्याला पोत्यामागे ₹२६० द्यावे लागतात तर गोळी-खताच्या पोत्या मागे शेतकऱ्यांना सुमारे ₹१६०० ते ₹१८०० इतके पैसे नाहक मोजावे लागत आहेत. अशामुळे तालुक्यातील अल्प-भूधारक शेतकऱ्यांच्यावर आर्थिक ताण पडत आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी या जाचक अटींच्या विरोधात शिवस्वराज जनकल्याण फाऊंडेशनने तालुक्यातील कृषी अधिकाऱ्यांची भेट घेऊन आवाज उठवला आहे.
खानापूर तालुक्यात किती शेतजमीन लागवडी खाली आहे आणि त्या जमीनीला किती प्रमाणात खताची आवश्यकता असते याची सर्व माहिती कृषी खात्याकडे असते. त्याप्रमाणे खात्याकडून प्रतिवर्षी हंगामासाठी खताचा साठा केला जातो. असे असताना बाजारात विक्रेत्यांच्याकडे किंवा शासन नियुक्त खत वितरकांकडे खताचा तुटवडा कसा होतो? असा सवाल शिवस्वराजच्या वतीने कृषी अधिकारी श्री सतीश माविनकोप यांना विचारण्यात आला आहे.
शिवस्वराज फाऊंडेनचे उपाध्यक्ष श्री. रमेश मल्हारी धबाले यांनी फाऊंडेशनच्या सदस्यांसह खानापूरच्या कृषी अधिकाऱ्यांची आज भेट घेऊन तालुक्यातील शेतकऱ्यांची व्यथा मांडली. त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना मिळणारी खते माफक दरात मिळत नाहीत. खताचा तुटवडा निर्माण झाला कि अनेकदा वाढीव दराने खते विकली जातात आणि शासन त्यावर कोणतीच कारवाई करत नाही. तेव्हा कृषी अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन स्वतः खत वितरकांच्या तथा विक्रेत्यांच्या दुकांनाना भेटी द्याव्यात आणि वाढीव दराने होणाऱ्या विक्रीला आळा घालावा. तसेच खत विक्रेत्यांनी खतांचे ‘दर-पत्रक’ विक्री स्थळांवर किंवा दुकाना समोर लावणे बंधनकारक करावे. अशाने काय दराने खत विक्री होत आहे हे कळेल. असे ‘दर-पत्रक’ कानडी आणि मराठी अशा दोन्ही भाषेत दिल्यास बहुसंख्य असलेल्या मराठी भाषिक शेतकऱ्यांना ते सहज कळेल, असे शिवस्वराजच्या श्री. नागेश भोसले यांनी सूचित केले.
यावेळी कृषी संचालक श्री. सतीश माविनकोप म्हणाले कि आपण नुकतेच कांही वितरकांकडे भेट दिली आहे. त्यांच्याकडे खताचा पुरेसा साठा आहे याची खात्री करून घेतली आहे. मात्र तालुक्यातील कृषी खात्यात अठ्ठावीस कृषी सहाय्यकांची पदे रिक्त आहेत आणि चार उपविभागांपैकी केवळ दोन उपविभागांमध्ये अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे, दोन उपविभागांत पदे रिक्त आहेत. त्यामुळे कृषी खात्यात मनुष्यबळ उपलब्ध नसल्याची खंत कृषी संचालकांनी व्यक्त केली आहे. यावरून लोकप्रतिनिधिंचे तालुक्याच्या कृषी विभागाकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. अधिकारी आणि कर्मचारी नसतील तर खात्याचा कारभार कसा चालणार? शेतकऱ्यांचे हित डोळ्यापुढे ठेऊन तालुक्याच्या लोकप्रतिनिधिंनी तात्काळ रिक्त पदे भरण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे नाही का?
कृषी अधिकाऱ्यांशी झालेल्या भेटीत तालुक्यातील शेतकऱ्यांना योग्य दरात आणि अल्पावधित खतांचा पुरवठा करण्यात यावा व जाचक अटी मागे घेण्यात याव्यात अन्यथा संघटनेतर्फे आवाज उठवून धरणे धरले जाईल अशा प्रकारचे निवेदन कृषी संचालकांना सादर करण्यात आले आहे. यावेळी झालेल्या चर्चेत पेरणीसाठी भाताचे कोणते बी शेतकऱ्यांना उपलब्ध केले जात आहे अशी विचारणा गर्लगुंजीच्या श्री. सुनील पाटील यांनी केली. तसेच अल्पभूधारकांना ५ ते १० किलोच्या बियानांच्या पिशव्या सुद्धा उपलब्ध करून देण्याची मागणी फाऊंडेशनच्या श्री संदेश कोडचवाडकर यांनी केली आहे. निवेदन देण्यासाठी कृषी अधिकाऱ्यांच्या कक्षात शिवस्वराज जनकल्याण फाऊंडेशनचे उपाध्यक्ष श्री. रमेश मल्हारी धबाले, सदस्य श्री. सुनील पाटील, श्री. नागेश भोसले, ॲड. अभिजित सरदेसाई, श्री. सुधीर वसंत नावलकर, श्री. संदेश प्रल्हाद कोडचवाडकर, श्री. प्रभु कदम आदि उपस्थित होते. यावेळी कृषी संचालकांनी निवेदन स्वीकारले आणि आवश्यक ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta