
खानापूर : बेळगाव डीसीसी बँकेच्या खानापूर शाखेबाबत सध्या शहरात वेगवेगळी चर्चा सुरू आहे. सदर शाखा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. डीसीसी बँकेच्या एका संचालकाच्या हेकेखोरपणामुळे शेतकऱ्याचे नुकसान होत असल्याचा आरोप एका शेतकऱ्याकडून केला जात आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, खानापूर तालुक्यातील सुरेश दंडगल नामक शेतकरी बँकेत पैसे काढण्यासाठी गेले असता त्यांच्या खात्यात पैसे असताना देखील संबंधित बँकेच्या अधिकाऱ्याने त्यांना पैसे देण्यास नकार दिला. सुरेश दंडगल यांच्या म्हणण्यानुसार ते बँकेत पैसे काढण्यासाठी गेले असता संबंधित अधिकाऱ्याने संचालकाच्या सांगण्यावरून त्यांना डीडी देण्यास नकार दिला. ग्राहकाच्या खात्यामध्ये पैसे शिल्लक असताना ते पैसे वापरून न देणे हे डीसीसी बँकेच्या कोणत्या नियमात बसते? आरबीआयने हा नियम फक्त डीसीसी बँकेसाठी वेगळा बनवला आहे का? असा सवाल खानापूर तालुक्यातील शेतकरी उपस्थित करीत आहेत. डीसीसी बँकेची खानापूर शाखा म्हणजे घाणेरड्या राजकारणाचा अड्डा बनला आहे. याचा त्रास शेतकरी बांधवांना होतोय. बँकेतील नोकऱ्या अन्य तालुक्यातील युवकांना देऊन तालुक्यातील युवकांवर अन्याय करीत आहेत. सदर संचालक हे राष्ट्रीय पक्षाशी संबंधित असल्यामुळे आमदार त्यांना पाठीशी घालत आहेत का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. डीसीसी बँकेच्या खानापूर शाखेतील या अनागोंदी कारभाराकडे तालुक्याचे आमदार, खासदार तसेच पालकमंत्र्यांनी लक्ष घालून तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी तालुक्यातील जनता करीत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta