
जांबोटी : आर्ट ऑफ लिविंग यांच्या “आंतरराष्ट्रीय मानवी मूल्य संस्था”(आयएएचव्ही) यांच्याकडून जांबोटी माध्यमिक विद्यालयाच्या वाचनालयास पन्नास हजार रुपयांच्या पुस्तकांची देणगी देण्यात आली. श्री श्री रविशंकर जी यांच्या प्रेरणेतून मराठी, इंग्रजी व हिंदी या तिन्ही भाषेतील दर्जेदार साहित्यिकांची सुमारे साडेपाचशे पुस्तके विद्यालयाकडे नुकताच एका कार्यक्रमात सुपूर्द करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वभारत सेवा समितीचे अध्यक्ष श्री. विजयराव नंदीहळी होते.
विद्यार्थिनींच्या इशस्तवनानंतर आर्ट ऑफ लिविंगचे अनुयायी श्री. रवी हिरेमठ यांच्या हस्ते सरस्वती प्रतिमेचे पूजन झाले. मान्यवरांनी रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. श्री. विजयराव नंदीहळी, रवी हिरेमठ व श्री. दत्तात्रय लवटे कोल्हापूर यांच्या हस्ते फीत कापून व दिपप्रज्वलन करून ग्रंथदालनाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी प्रमुख वक्ते म्हणून बोलताना ज्योतिर्लिंग हायस्कूल कसबा बोरगाव कोल्हापूर येथील निवृत्त मुख्याध्यापक व साहित्यिक श्री. दत्तात्रय लवटे (कोल्हापूर) म्हणाले, “पुस्तके ही जीवन जगण्याची कला शिकवितात, त्यामुळे वाचनाची आवड झोप असणे ही आजची गरज आहे. मातृभाषेचे सौंदर्य पहायचे असेल तर विद्यार्थ्यांनी पुस्तकांची मैत्री केली पाहिजेत. म्हणून या पुस्तकांचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा. यावेळी त्यांनी अनेक कविता सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. आर्ट ऑफ लिविंग च्या प्रतिनिधी कुमारी पूजा माळी श्रीमती शोभा लवटे, रवी हिरेमठ, विजयराव नंदीहळी यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. ही पुस्तके मिळवण्यासाठी श्रीमती संपदा तिरविर यांनी विशेष प्रयत्न केले त्यामुळे त्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताविक मुख्याध्यापक महेश सडेकर यांनी केले, सहशिक्षक तुकाराम सडेकर यांनी सूत्रसंचालन व दिनकर पाटील यांनी आभार मानले. विद्यार्थी, शिक्षक व पालक वर्ग उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta