खानापूर (प्रतिनिधी) : गर्लगुंजी (ता. खानापूर) येथील जीर्णोद्धार करून नव्याने बांधण्यात येत असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिराच्या नुतन इमारतीच्या रंगकामासाठी गर्लगुंजी गावचे सुपुत्र व माऊली एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक जयसिंग कृष्णाजी पाटील यांनी पुढाकार घेऊन १,२५,५५५ रूपयाचा धनादेश श्री महालक्ष्मी मंदिराच्या बांधकाम कमिटीकडे सोमवारी दि. २४ रोजी मंदिर बांधकाम कमिटीकडे सुपूर्द केला. तसेच यापूर्वी त्यांनी मंदिर बांधकामासाठी ११ हजार रूपयाची देणगी देऊ केली आहे.
यावेळी माजी ग्राम पंचायत अध्यक्ष गोपाळ पाटील, मंदिर बांधकाम कमिटाचे सचिव जे. बी. पाटील, नंदू निट्टरकर, सोमनाथ यरमाळकर, भरत गोरे, बाळू वड्डेबैलकर, यल्लापा व्हळणाचे, गोपाळ वड्डेबैलकर, श्री. मेलगे, तसेच मंदिर बांधकाम कमिटीचे सदस्य, ग्राम पंचायत सदस्य, गावचे पंचमंडळी व नागरिक उपस्थित होते.
यावेळी ग्रामस्थांच्या बैठकीत लक्ष्मी व मर्याम्मा मुर्तीप्रतिष्ठापना, कार्यक्रम आणि माऊली यात्रोत्सव यावर चर्चा होऊन खालीलप्रमाणे तारखा ठरविण्यात आल्या आहेत.
यासाठी कार्यक्रमाच्या तारखांमध्ये लग्न कार्य तसेच इतर कार्यक्रम ठेऊ नयेत, असे गाव कमिटीच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे.
येत्या सोमवारी दि. ७ फेब्रुवारी मर्याम्मा मूर्ती हलवणे, व भटजींच्या उपस्थित आघोर शांती करणे, मंगळवारी दि. १९ एप्रिल उडगाम्मा यात्रा, शुक्रवारी दि. २९ एप्रिल यल्लामा मारग मळणे, आदी कार्यक्रम होणार आहेत.
मंगळवारी दि. ३ व बुधवारी दि. ४ मे रोजी लक्ष्मी व मर्याम्मा मुर्तीची गावातुन मिरवणूक निघणार आहे. गुरूवारी दि. ५ मे रोजी लक्ष्मी मंदिर वास्तू शांती कार्यक्रम होणार आहे. तर शुक्रवारी दि. ६ मे लक्ष्मी व मर्याम्मा मुर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. तसेच मंगळवारी दि. १० मे ते शुक्रवारी दि. १३ मे पर्यंत गर्लगुंजी गावचे ग्रामदैवत श्री माऊली देवीची सालाबादप्रमाणे यात्रोत्सव होणार आहे.