
खानापूर : खानापूर तालुक्यातील विविध समस्यांबाबत आणि मराठी नामफलकाबाबत तहसीलदार कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, हेस्कॉम, आरोग्य विभाग आणि बस व्यवस्थापक यांना खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आज दि. 30 जून रोजी निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे, पावसामुळे तालुक्यातील गावांना जोडणाऱ्या रस्त्यांवर मोठे खड्डे पडले असून दैनंदिन वाहतूक आणि आपत्कालीन सेवांवर गंभीर परिणाम झाला आहे. तसेच असोगा गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर रेल्वे विभागाच्या वतीने भुयारी मार्ग बनविण्यात येत असलेल्या जागेवर रस्ता खचला आहे. यामुळे प्रवास करणे सुद्धा धोकादायक आणि कठीण झाले आहे. तसेच, हा रस्ता सुद्धा बंद होण्याच्या मार्गावर आहे. तालुक्यातील अनेक रस्ते खराब झाले असून तात्काळ दुरुस्ती करावी.
पावसाळ्यात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडून बहुतांश भागातील अनेक विद्युत खांबांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे अनेक गावांमध्ये वारंवार आणि दीर्घकाळ वीजपुरवठा खंडित होत आहे. याबाबत संबंधित विभागाला अखंडित वीजपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी व खराब झालेल्या विद्युत खांबाच्या जागेवर लवकरात लवकर पुन्हा नवीन खांब उभारण्याचे निर्देश देण्यात यावेत. या वर्षाचे शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. मात्र काही गावांमध्ये बस वेळेवर येत नाही. त्यामुळे, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शाळा आणि महाविद्यालयाच्या वेळेनुसार गावांपासून खानापूर पर्यंतच्या बसच्या वेळापत्रकात बदल करावेत. आणि खानापूर तालुक्यातील 90% पेक्षा जास्त लोक मराठी भाषिक आहेत. त्यामुळे, स्थानिक लोकांच्या सोयीसाठी सरकारी रुग्णालयात कन्नडसह मराठी भाषेत सूचना आणि दिशादर्शक नामफलक लावण्याची मागणी करण्यात आली. तसेच याअगोदरही निवेदन देण्यात आले आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे तरी निवेदनात नमूद केलेल्या तालुक्यातील सर्व समस्या संबंधित खात्याने तात्काळ सोडवाव्यात अशी मागणी करण्यात आली. तहसीलदारांच्या अनुपस्थितीत ग्रेड टू तहसीलदार राकेश बुवा यांनी निवेदन स्वीकारले.
निवेदन देताना माजी आमदार दिगंबर पाटील, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, सरचिटणीस आबासाहेब दळवी, संजीव पाटील, गोपाळ पाटील, पांडुरंग सावंत, जयराम देसाई, कृष्णा मनोळकर, अरुण देसाई, मोहन गुरव, कृष्णा कुंभार, जयराम देसाई, मऱ्याप्पा पाटील, म्हात्रू धबाले, भीमसेन करंबळकर, ब्रह्मानंद पाटील, तुकाराम गोरल, संदेश कोडचवाडकर, रणजीत पाटील, पुंडलिक पाटील, शंकर गुरव, श्रीकांत दामले, नारायण पाटील, प्रल्हाद घाडी, संतोष गावडा आदी उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta