
खानापूर : खानापूर तालुक्यातील नंदगड आणि बैलहोंगल तालुक्यातील संगोळी येथे राहिलेली विकासकामे आणि सौंदर्यीकरणासाठी सरकारने २८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे, अशी माहिती संगोळी रायन्ना विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि इतर मागासवर्गीय कल्याण मंत्री शिवराज तंगडगी यांनी दिली.
बंगळूरू येथील विकास सौधमध्ये त्यांच्या अध्यक्षतेखाली संगोळी रायन्ना विकास प्राधिकरणाची बैठक झाली. या बैठकीला खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर, बैलहोंगलचे आमदार महांतेश कौजलगी, हमी योजना अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष एच.एम. रेवन्ना आणि प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.
नंदगड आणि संगोळी येथे सुरू असलेल्या आणि पूर्ण झालेल्या विकासकामांची माहिती अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली. १६ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या नंदगड येथे २८ कोटी रुपयांच्या निधीतून हाती घेण्यात येणाऱ्या कामांचे भूमिपूजन करतील. नंदगडमधील ऐतिहासिक कमल सरोवराचे सुशोभीकरण करण्याचे काम सुरू आहे. सरोवराच्या मध्यभागी क्रांतिवीर संगोळी रायन्ना यांचा पुतळा बसवण्यात आला आहे. या सरोवराभोवती कंपाऊंड, गटार बांधकाम करून इतर पर्यटन सुविधा विकसित करण्यासाठी प्राधिकरणाने अतिरिक्त ३ कोटी रुपये मंजूर केले आहेत. हा निधी जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित केला जाईल आणि सरोवराच्या सुशोभीकरणाचे काम जिल्हा परिषद स्वतः हाती घेईल. संग्रहालयाचे उद्घाटन १६ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री करणार आहेत, अशी माहिती आमदार विठ्ठल हलगेकर यांनी दिली.

Belgaum Varta Belgaum Varta