
खानापूर : खानापूर येथील मारवाडी समाजातील प्रतिष्ठित नागरिक सूर्या सॉ मिलचे दयालाल कर्षन पटेल (वय 65) यांचा मृतदेह कुप्पटगिरी नजीक मलप्रभा नदीपात्रात बांबूच्या झुडूपात अडकलेला आढळला. दयालाल कर्षन पटेल हे मंगळवार दिनांक 8 जुलैपासून बेपत्ता होते. कुटुंबीयांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला होता. मंगळवारी सायंकाळी मलप्रभा नदीच्या घाटावर त्यांचे चप्पल आढळून आल्यामुळे संशय बळावला. त्यानंतर अग्निशामक दलाच्या मदतीने मलप्रभा नदीपात्रात शोध मोहीम सुरू करण्यात आली. अखेरीस शुक्रवारी 12 जुलै रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास अग्निशामक दलाच्या जवानांना कुप्पटगिरी येथील पुलापासून काही अंतरावर एका बांबूच्या झुडूपामध्ये अडकलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला. या शोध मोहिमेमध्ये अग्निशामक दलाचे प्रभारी स्टेशन इन्चार्ज सचिन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एफ.डी. मारुती देसाई, एफ.डी. शरीफ नदाफ, मुदगाप्पा तरगार, सुनील शीमनगौडर, संजय जंगी आणि रविकुमार मल्लूर या अग्निशामक दलाच्या जवानांनी परिश्रम घेतले. मलप्रभा नदी दुथडी भरून वाहत असताना अग्निशामक दलाच्या जवानांनी ही कामगिरी यशस्वीरित्या पार पडल्याबद्दल अग्निशामक दलाच्या जवानांचे खानापूर शहरात कौतुक होत आहे. त्यांच्या सतर्कतेमुळे मृतदेह सापडू शकला. या घटनेमुळे खानापूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Belgaum Varta Belgaum Varta