
खानापूर : खानापूर तालुक्यातील नेरसा ग्रामपंचायतच्या अखत्यारीत येणारे गवाळी हे जेमतेम हजार लोकसंख्या असलेले गाव. खानापूर तालुक्यातील भीमगड अभयारण्य निसर्गाच्या कुशीत वसलेले हे गाव मूलभूत नागरिक सुविधांपासून वर्षानुवर्षे वंचित आहे. जवळपास 200 कुटुंब असणारे गवाळी हे गाव सर्व मूलभूत सोयी सुविधा पुरवून एकाच ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावे, अशी मागणी गवाळी ग्रामस्थांनी कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे केली आहे. खानापूर शहरापासून सुमारे 30 ते 32 किलोमीटर अंतरावर भीमगड वन्यजीव अभयारण्य डोंगराळ प्रदेशात गवाळी हे गाव वसले असून रस्ते, पूल यासारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित राहिले आहे. वन्य विभागाच्या काही कठोर नियमांमुळे या गावातील नागरिकांना दैनंदिन जीवनात विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. दरवर्षी पावसाळ्यात किमान चार महिने या गावांचा शहराशी संपर्क पूर्णपणे तुटलेला असतो त्यामुळे ग्रामस्थांना तातडीच्या सेवा उपलब्ध होत नाहीत. बऱ्याचदा वैद्यकीय सेवा वेळेवर न मिळाल्यामुळे कित्येक ग्रामस्थांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे या भीमगड वन्यजीव अभयारण्य क्षेत्रातून बाहेर पडून शांततापूर्ण जीवन जगण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. आम्ही आमच्या गावातून योग्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तयार आहोत मात्र आमचे संपूर्ण गाव एकाच वेळी एकाच ठिकाणी स्थलांतरित करावे. त्याचप्रमाणे सरकारने आम्हाला गृहनिर्माण सुविधा पुरवाव्यात व घरे बांधण्यास परवानगी द्यावी. सरकारने विस्थापित कुटुंबांना प्रकल्प निर्वासित प्रमाणपत्र द्यावे. नव्याने बांधलेल्या गावात पिण्याचे पाणी, रस्ते आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. गवाळी ग्रामस्थाना एकाच ठिकाणी स्थलांतरित करावे जेणेकरून आमच्या गावातील लोकांनी शेकडो वर्षापासून जोपासलेली संस्कृतीक, वारसा, सभ्यता आणि बंधुता जपण्यास मदत होईल अशी मागणी करणारे निवेदन मुख्यमंत्र्यांसहित इतर संबंधित अधिकाऱ्यांना गवाळी ग्रामस्थांकडून देण्यात आले आहे. सदर निवेदनाच्या प्रती राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी, वनमंत्री ईश्वर खंडरे, महसूल मंत्री कृष्णा भैरेगौडा, खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी, खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठल हलगेकर, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पंचायत चिफ सेक्रेटरी राहुल शिंदे, त्याचप्रमाणे वनखात्याच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta