
अधिक माहितीसाठी लिंकवर क्लिक करा : https://belgaumvarta.com/delvin-infrastructures/
——————————————————————
—————————————————————–
खानापूर : शेतकऱ्याची बैलजोडी तलावात बुडून मृत्यू पावल्याची दुर्दैवी घटना बुधवारी (ता. १६) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास खानापूर तालुक्यातील बेकवाड-हडलगा रस्त्यालगत घडली. शेतकरी गुंजू विठ्ठल पाटील यांचे अंदाजे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, गुंजू पाटील हे आपल्या शेतात भात रोप लावण्यासाठी मशागत करून बैलांसह परतत होते. दरम्यान, गावापासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या तलावात चिखलाने माखलेल्या बैलांना धुण्यासाठी ते गेले. मात्र, रोजगार हमी योजनेअंतर्गत खणण्यात आलेल्या खोल खड्ड्याचा अंदाज न आल्याने, दोन्ही बैल त्या खड्ड्यात पडले. बैलजोडी जु (दांडे) बांधलेली असल्याने दोन्ही बैलांचा पाण्यात गुदमरून मृत्यू झाला.
शेतकऱ्याने हंबरडा फोडल्यावर परिसरातील इतर शेतकरी धावून आले आणि बैलांचे मृतदेह बाहेर काढले. नंतर नंदगड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. शेतकऱ्याचे अंदाजे दीड लाखाचे नुकसान झाले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta