खानापूर : बेळगावच्या भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांनी आपली संस्था नियती फाउंडेशनच्या माध्यमातून आज गुरुवारी खानापूर प्रथम दर्जा सरकारी महाविद्यालयाला सुमारे 1 लाख रुपये किंमतीचे 40 बेंचेस देणगी दाखल दिले.
खानापूर प्रथम दर्जा सरकारी महाविद्यालयाची पटसंख्या सुमारे 1 हजार इतकी आहे. या ठिकाणी बीबीए, बीए आणि बीकॉम अभ्यासक्रम शिकविला जातो. महाविद्यालयातील पटसंख्या अर्थात विद्यार्थी -विद्यार्थिनींच्या तुलनेत या ठिकाणी विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बेंचचा तुटवडा असल्याचे महाविद्यालय प्रशासनाने डॉ. सरनोबत यांच्या निदर्शनास आणून दिले होते. या समस्येची तात्काळ दखल घेऊन डॉ. सोनाली सरनोबत यांनी आज नियती फाउंडेशनच्या माध्यमातून सुमारे 1 लाख रुपये किंमतीचे 40 बेंच सदर महाविद्यालयाला देणगीदाखल दिले.
यावेळी बोलताना डॉ. सरनोबत यांनी समाजात अनेक चांगले लोक आहेत जे इतरांच्या अडीअडचणीच्या काळात नेहमी मदतीला धावून जातात. परंतु विद्यार्थ्यांनी आपले लक्ष्य साध्य करण्यासाठी कठोर मेहनत आणि प्रामाणिकपणे अभ्यास केला पाहिजे असे सांगून त्यांनी नियती फाउंडेशनचा गेल्या 20 वर्षातील प्रवासाची माहिती थोडक्यात दिली. सोनाली सरनोबत यांच्या नेतृत्वाखालील नियती फाउंडेशनने आजतागायत समाज हिताची असंख्य कामे केली आहेत. वंचित मुलांना शिष्यवृत्ती, मोबाईल फोन आणि लॅपटॉपच्या स्वरूपात मदत करण्याबरोबरच त्यांनी अनेक क्रीडापटू, कलाकार आणि निराधारांना सहाय्य केले आहे. खानापूर तालुका आणि बेळगाव परिसरातील अनेक वंचित नागरिक, अनाथालय, वृद्धाश्रम नियती फाउंडेशनचे लाभार्थी आहेत.
खानापूर सरकारी कॉलेज अर्थात महाविद्यालयातील बेंच वितरण कार्यक्रमाप्रसंगी भाजप शक्तीकेंद्र प्रमुख विठ्ठल निडगलकर, ग्रा. पं. सदस्य सुरेश गंदिगवाड, ईश्वर सानिकोप, प्राचार्य डी. एम. जवळकर, डॉ. सी. बी. तंबोजी, ए. बी. नायकर, रिजवान गड्डीकर, अर्जुन गुरव, महेश गुरव, उषा अंबोजी, नागेश रामजी, बसवराज कडेमनी आदींसह प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी -विद्यार्थिनी उपस्थित होते.