गटनेते विलास गाडीवड्डर : विरोधी गटाच्या बैठकीत सत्ताधाऱ्यांना निशाणा
निपाणी : विरोधी गटातील गटनेत्यांची पात्रता काय आहे, हे बऱ्याच वर्षापूर्वी निपाणी शहरातील नागरिकांना माहित आहे. त्यामुळे आपली पात्रता पाहण्यापेक्षा नगराध्यक्षासह त्यांच्या नेत्यांची पात्रता काय आहे हे पोटनिवडणुकीत जनतेने भरघोस मते देऊन दाखवून दिले आहे. नगरपालिका बैठकीला सर्वसामान्यांना सभाग्रहात न घेता पोलीस बंदोबस्तात होत असलेल्या सभांमुळे सत्ताधाऱ्यांची पात्रता काय आहे, हे सर्वांना कळून चुकले आहे. भविष्यात सत्ताबदल करून सभागृहात सर्वसामान्य नागरिकांना प्रवेश देऊन खुल्या बैठका घेणार असल्याचे रोजी गटनेते विलास गाडीवड्डर यांनी स्पष्ट केले. शुक्रवारी दुपारी आपल्या कार्यालयात आयोजित विरोधी गटाच्या बैठकीत ते बोलत होते.

यावेळी नगरसेवक डॉ. जसराज गिरे, दत्ता नाईक, दीपक सावंत, दिलीप पठाडे यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.
नगरसेवक गाडीवड्डर म्हणाले, भविष्यात होणाऱ्या नगरपालिकेच्या बैठकित शहरवासीयांना बोलावून प्रत्येक विषयावर चर्चा करण्याचे धाडस सत्ताधाऱ्यांनी बाळगावे. त्यावेळी तुमची पात्रता काय आहे हे जनतेला समजणार आहे. गुरुवारचा आठवडी बाजारातील स्वच्छता तात्काळ होत नसल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे सदर कचरा रात्रीच उचलणे गरजेचे आहे. तलाव परिसरात संरक्षण भिंत बांधण्यासाठी आपल्याच कंत्राटदाराला निविदा भरण्याची सूचना केली होती. काम निकृष्ट होत असेल तर त्यांच्यावर कारवाई केल्यास आपली कोणतीच हरकत नाही. सत्ताधाऱ्यांच्या नेतेमंडळींनी परिसरातील जागेची खरेदी केले असून तेथे अतिक्रमण होऊ नये म्हणूनच ही संरक्षण भिंत बांधली आहे. उर्वरित काम सत्ताधार्यांनी पूर्ण करावे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती स्तंभ कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत असून ते पुराव्यानिशी सिद्ध करावे.
दत्त खुले नाट्यगृह जवळील तलावाच्या पुनरुज्जीवन याबाबत तीनवेळा सभागृहात चर्चा झाली असून त्कालीन जिल्हाधिकार्यांनी पाण्याचे स्तोत्रसाठी ते काम होणे गरजेचे असल्याचे सांगितले होते. पण या कामातही तत्कालीन आमदारांनी ढवळाढवळ केली होती. शिवाय संबंधित नेतेमंडळींच्या कंत्राटदारांनी हे काम केले आहे. यापुढील काळातील नियोजन करता येत नसल्याने हे काम चुकीचे म्हणने त्यावरूनच त्यांची पात्रता स्पष्ट होते. आपण मंजूर केलेल्या कामांमध्ये बऱ्याच प्रभागात फेरबदल करण्यात आले आहेत. त्याची सर्व कागदपत्रे आपल्याकडे असून कधीही खुलेआम चर्चेसाठी तयार राहावे, असे आव्हानही गाडीवड्डर यांनी दिले.

पात्रताअभावी पद मिळाल्यास दुर्बुद्धी
पात्रता नसताना पद मिळाले की दुर्बुद्धी सुचते. जनतेला सामोरे जाण्याच्या भीतीपोटी त्यांना सभागृहात बोलण्यास मज्जाव केला जातो. त्यामुळे नागरिक आपल्या समस्याबाबत निवेदन मोर्चा काढत आहेत. नागरिकांनीच त्यांना निवडून दिले असल्याने त्यांना सभागृहात बोलावून कामाची माहिती देणे आवश्यक असताना त्यांना कधीच सभाग्रहात बोलविलेले जात नाही. पोलिसांच्या दंडुकशाहीमध्ये सभागृह चालविण्याची नवीन संस्कृती सत्ताधाऱ्यांनी अवलंबली आहे. पंधरा महिन्यानंतर येणाऱ्या सार्वजनिक निवडणुकी दरम्यान नगराध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपणार आहे. तेव्हा तुमची पात्रता काय आहे, हे जनताच ठरवेल असा टोला गाडीवड्डर यांनी लगावला.