
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकारणीची महत्त्वपूर्ण बैठक रविवार दि. 3 ऑगस्ट रोजी शिवस्मारक येथे संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळराव बळवंतराव देसाई हे होते. बैठकीचे प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी केले.
यावेळी कर्नाटक सरकार कन्नडसक्तीची तीव्र अंमलबजावणी करीत आहे व काही कन्नड संघटनांच्या दबावाखाली येत मराठीचे संपूर्ण उच्चाटन करण्याचे ठरवून दादागिरी करत संविधानाची पायमल्ली सीमाभागात चालविली आहे. या विरुद्ध मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने भव्य मोर्चा सोमवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे. हा मोर्चा धर्मवीर संभाजी चौकातून सकाळी 11 वाजता निघून जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचेल. यासाठी खानापूर तालुका समितीने आपला पाठिंबा व्यक्त करत हजारोंच्या संख्येने मोर्चाला उपस्थित राहण्याचे जाहीर केले आहे.
यावेळी बेळगाव महानगरपालिकेचे मराठी नगरसेवक रवी साळुंखे, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, नगरसेविका वैशाली भातकांडे यांनी मराठी बाणा दाखवत महानगरपालिकेमध्ये कर्नाटक सरकारच्या कन्नडसक्तीबद्दल निषेध व्यक्त करून सभात्याग केला याबाबत खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीकडून त्यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. यावेळी माजी आमदार दिगंबरराव पाटील, सुधीर पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्य जयराम देसाई, राजाराम साताप्पा देसाई, वसंत नवलकर, पांडुरंग तुकाराम सावंत, बाळासाहेब शेलार, भीमसेन करंबळकर यांनी मोर्चा यशस्वी करण्याबाबत आपले मनोगत व्यक्त केले. या बैठकीला कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, सहसेक्रेटरी रणजीत पाटील, संजय पाटील, खजिनदार संजीव पाटील, नंदगड विभाग उपाध्यक्ष रमेश धबाले, कृष्णा मन्नोळकर, माजी सभापती मारुतीराव परमेकर, गोपाळ पाटील, अजित पाटील, म्हात्रु धबाले, बाबुराव पाटील गुरुजी, जयसिंग बाबुराव पाटील, डी. एम. भोसले गुरुजी, विठ्ठल निंगाप्पा गुरव, बी. बी. पाटील, नागेश बोभाटे, रवींद्र शिंदे, पुंडलिक पाटील, शिवाजी पाटील, पिंटू नावलकर, राजू चिखलकर, एम. ए. खांबळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta