खानापूर : कर्नाटकातील दसरा क्रीडा महोत्सवाला अन्यनं साधारण महत्त्व आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून कर्नाटकातील खेळाडूंना खेळाचे भक्कम व्यासपीठ मिळते हे सर्वश्रुत आहे.
येथील शांतीनिकेतन शाळेच्या क्रिडांगणावर नुकत्याच संपन्न झालेल्या विविध स्पर्धांचे निकाल हाती आले असून कबड्डी खेळात महिला ओपन गटात मराठा मंडळ शिक्षण संस्थेच्या ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयातील खेळाडूनी जलद निर्णय क्षमतेसह,अद्वितीय सामर्थ्य आणि चपळतेच्या जोरावर निर्विवादपणे प्रथम क्रमांक पटकाविला आहे..!
भारताचा सांस्कृतिक वारसा सांगणाऱ्या कबड्डी खेळाकडे मराठा मंडळ शिक्षण संस्थेचे विशेष लक्ष असून, मराठा मंडळाच्या अध्यक्षा डॉ. राजश्रीताई नागराजू यांच्या प्रोत्साहनाखाली, गेले दोन तीन महिने कशाचीही तमा न बाळगता, अव्वल कबड्डी कोच श्री. भरमाजी पाटील व कोवाड-किने येथील प्रो कबड्डी खेळाडू श्री. आप्पाजी पाटील, सहकारी श्री. जोतिबा घाडी, प्रा. मंगल देसाई, प्रा. आर व्ही मरीत्तमण्णावर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणाऱ्या या खेळाडूंनी आपली चमक दाखवत तालुक्यात अव्वलस्थानी येणाचा मान मिळविला आहे.
संघ कॅप्टन कुमारी लक्ष्मी गोरल हिच्या नेतृत्वाखाली खेळणारा हा संघ बेस्ट ऑलराऊंडर संगिता होसुरकर, चाणाक्ष रेडर कुमारी साधना होसुरकर व बेस्ट कॅचर कुमारी प्राजक्त निडगलकर, यांच्या दमदार खेळातून हा संघ कु. वैष्णवी कदम, कु. विजया बिर्जे, कु. सानिया वीर कु. रोशनी घाडी, कु. दिव्या शिरोडकर कु. आस्मा मकानदार, कु. स्वाती पाटील, कु. प्राजक्ता पाटील, कु. जिजाबाई गुरव व कु. नेहा मिराशी यांच्या मेहनतीने या स्पर्धेच्या पहिल्या नंबरचा मानकरी ठरला आहे.
कबड्डी क्रीडागंणावरील उत्स्फूर्त प्रतिसाद पाहिल्यावर असे लक्षात येत होते की उत्तम चढाई आणि तत्पर पकडीच्या जोरावर या संघातील खेळाडूंनी उपस्थित क्रीडा प्रेमींचे मनोरंजन तर केलेच, शिवाय प्रेक्षकांची मनंही जिंकल्याचे टाळ्या आणि प्रतिकात्मक आवाजातून निदर्शनास येत होते.
या खेळाची स्थानिक परंपरा व वारसा कायम ठेवण्यासाठी, मराठा मंडळ शिक्षण संस्थेच्या ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयासह, खानापूर तालुक्याचा नावलौकिक वाढविण्यासाठी काॅलेजचे प्राचार्य श्री. अरविंद पाटील व समस्त प्राध्यापक वर्ग कसोशीने प्रयत्न करीत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta