खानापूर : खानापूर तालुका पंचायतीच्या सभागृहात आज मंगळवार दि. 2 सप्टेंबर 2025 रोजी गॅरंटी योजना समितीची मासिक बैठक संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पाच गॅरंटी योजनेचे तालुका अध्यक्ष श्री. सूर्यकांत कुलकर्णी होते. बैठकीत पाच गॅरंटी योजनेच्या अधिकाऱ्यांसह मान्यवर सदस्य उपस्थित होते.
बैठकीदरम्यान विविध योजनांची सविस्तर माहिती अधिकाऱ्यांनी दिली. गृहलक्ष्मी योजनेअंतर्गत खानापूर तालुक्यात तब्बल 64,125 लाभार्थ्यांना दरमहा प्रत्येकी 2,000 रुपये प्रमाणे एकूण 12 कोटी 82 लाख 50 हजार रुपये बँक खात्यात जमा झाल्याची माहिती सीडीपीओ श्री. बजंत्री यांनी दिली.
गृहज्योती योजनेअंतर्गत तालुक्यातील 61,556 लाभार्थ्यांचे विज बिल ऑगस्ट महिन्यात 1 कोटी 99 हजार 12 रुपये इतके माफ झाले असल्याची माहिती हेस्कॉमचे अधिकारी श्री. जगदीश मोहिते यांनी दिली. यावेळी जांबोटी भागातील विजेच्या समस्येवरही त्यांनी सविस्तर माहिती दिली. बेळगाववरून येणाऱ्या विद्युत लाईनमुळे तिथे अडचणी निर्माण होत असल्याचे सांगून पावसाळ्यानंतर सोनारवाडी या ठिकाणी जागा भाड्याने घेण्यात आली आहे, त्या ठिकाणी नवीन पॉईंट उभारून समस्या सोडवली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
शक्ती योजनेअंतर्गत महिलांसाठी मोफत बस प्रवासामुळे केवळ ऑगस्ट महिन्यातच सरासरी 6 लाख 38 हजार 497 रुपये इतका फायदा महिलांना झाला आहे. संपूर्ण वर्षभरात या योजनेतून 1 कोटी 97 लाख 93 हजार 413 रुपयांचा लाभ महिलांना मिळाल्याचे परिवहन विभागाच्या अहवालातून स्पष्ट झाले असल्याचे सांगण्यात आले.
रेशन विभागाकडून ऑगस्ट महिन्यात लाभार्थींना तांदूळ व जोंधळे वाटप करण्यात आले होते. तर सप्टेंबर महिन्यात सर्वांना तांदूळ वाटप करण्यात येणार असल्याची माहिती फूड इन्स्पेक्टर श्री. खातेदार यांनी दिली.
युवा निधी योजनेअंतर्गत खानापूर तालुक्यातील 8,037 युवक-युवतींना लाभ मिळाल्याचेही बैठकीत सांगण्यात आले.
अध्यक्ष श्री. सूर्यकांत कुलकर्णी यांनी सांगितले की, सरकारच्या आदेशानुसार या महिन्यात प्रत्येक जिल्हा परिषद विभागाप्रमाणे, प्रत्येक ग्रामपंचायतीत गॅरंटी योजना शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. सुरुवात गर्लगुंजी, पारिषवाड, नंदगड, गुंजी, बिडी व जांबोटी ग्रामपंचायतीपासून होणार आहे. या शिबिरांमध्ये नागरिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी पाचही गॅरंटी योजनांचे अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित राहतील, असेही त्यांनी स्पष्टपणे नमूद केले.
या बैठकीला गॅरंटी योजना समितीचे सदस्य प्रकाश मादार, इसाखान पठान, रुद्राप्पा पाटील, बाबू हत्तरवाड, संजय गावडे, प्रियांका गावकर, गोविंद पाटील, विवेक तडकोड, दीपा पाटील, शांताराम गुरव, जगदीश पाटील, युशुफ हरगी यांच्यासह तालुका पंचायत अधिकारी रमेश मेत्री, विजय कोतीन (A.D.P.R.), श्रीकांत सपटला व मॅनेजर आदी मान्यवर उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta