खानापूर : शिक्षक हा समाजाचा कणा असतो. अशा शिक्षकाच्या शैक्षणिक आयुष्यात अनेक चढ उतार येतात पण त्या चढ उतारातून देखील यशाची गुरुकिल्ली साधण्याची धडपड अनेक शिक्षकांच्यात असते. शिक्षकांना आपला विद्यार्थी एक उत्तम व चांगला घडावा हीच आकांक्षा असते. आपण जीवनात शिक्षक म्हणून काम करताना काय सार्थक केले याचा मागोवा म्हणजे त्या शिक्षकाला मिळालेला सन्मान असतो. संपूर्ण शैक्षणिक आयुष्यात केवळ जिद्द व चिकाटी राखून शिक्षक बनण्याचे धैर्य ज्यांच्या अंगी असते तेच खरे हाडाचे शिक्षक असतात. अशात एक माध्यमिक विभागातून अनेक वर्षे विनाअनुदानित सेवा बजावून सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेले चावगावचे एक शारीरिक शिक्षक श्री. पी. बी. अंबाजी हे श्री चांगळेश्वरी शिक्षण संस्था संचलित श्री ज्ञानेश्वर विद्यालय, लोकोळी येथे शारीरिक शिक्षक आहेत. यंदा त्यांना तालुकास्तरावरील आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांना मिळालेला हा पुरस्कार त्यांच्या कर्तव्यदक्ष कार्याची पोचपावतीच असून त्यांच्या या पुरस्काराबद्दल चापगाव व परिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
चापगाव येथे जन्मलेले अंबाजी सर यांनी प्राथमिक शिक्षण चापगाव, माध्यमिक शिक्षण एम. जी. हायस्कूल, नंदगड, पदवी शिक्षण इंग्रजी विषयात मराठा मंडळ डिग्री कॉलेज, खानापूर व सी. पी. एड. शिक्षण बेनन स्मिथ कॉलेज, बेळगाव येथे पूर्ण केले. कुटुंब शेतकरी असून मोठ्या भावांच्या मार्गदर्शनाचा लाभ झाला. 1995 ते 2014 या कालावधीत त्यांनी लोकोळी हायस्कूलमध्ये विनामोबदला सेवा केली. 2014 पासून अनुदानित सेवेत कार्यरत असून 2026 मध्ये ते सेवानिवृत्त होणार आहेत. केवळ बारा वर्षांची पगारी सेवा असूनही त्यांनी शिक्षकी पेशाशी निष्ठा ठेवली.
अनेक संकटांतही ते धैर्याने उभे राहिले. पावसाळ्यात यडोगा येथे सायकल ठेवून चिखलातून चालत शाळेत पोहोचणे, नाले पार करताना वेलीच्या आधाराने जीव वाचवणे तसेच ओले कपडे बदलून शाळा सुरू ठेवणे – या त्यांच्या चिकाटीचे उदाहरण आहे. शेतीचा जोडधंदा सांभाळत विद्यार्थ्यांना नेहमी प्राधान्य दिले. अशा या कर्तव्यनिष्ठ व समर्पित शिक्षकास उदंड आयुष्य लाभो व त्यांच्या कार्याचा योग्य गौरव होवो, हीच शुभेच्छा.
Belgaum Varta Belgaum Varta