खानापुरात सरकारी विद्यालयात इमारतीचे भूमिपूजन!
खानापूर : खानापूर तालुक्याच्या शैक्षणिक विकासासाठी आमचा नेहमी प्रयत्न असणार आहे. मागील सरकारच्या काळात खानापूर तालुक्यातील दोन सरकारी विद्यालयाच्या विकासासाठी तत्कालीन शैक्षणिक मंत्री सुधाकर यांच्याकडे आम्ही अर्ज विनंती केली होती. त्यानंतर देखील विद्यमान सरकारकडे आपण या दोन महाविद्यालयांच्या इमारत विकासासाठी निधीचा प्रस्ताव केला होता त्यानुसार खानापूर येथील सरकारी विद्यालयात पहिल्या मजल्यावरील खुल्या जागेत पाच वर्ग खोल्यासाठी 1 कोटी 20 लाखाचा निधी तर बिडी या ठिकाणी मंजूर झालेल्या सरकारी पदवी पूर्व विद्यालयासाठी 1 कोटी 60 लाखाचा निधी मंजूर झाला आहे. या निधी अंतर्गत दोन्ही ठिकाणी सुसज्ज अशा वर्गखोल्यांची निर्मिती होणार आहे. तालुक्यात शैक्षणिक दर्जा सुधारावा हाच आपला नेहमी हेतू असून अजूनही शैक्षणिक विकासासाठी आपण प्रयत्नशील आहे, असे मत खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी शुक्रवारी खानापूर येथे सरकारी महाविद्यालयात इमारत बांधकामाच्या भूमीपूजन प्रसंगी व्यक्त केले. स्वागत भारतीय जनता पार्टीचे प्रधान कार्यदर्शी मल्लाप्पा मारीहाळ यांनी केले. यावेळी खानापूर तालुका भाजपा अध्यक्ष बसवराज सानिकोप, भाजपा प्रधान कार्यदर्शी गुंडू तोपिनकट्टी, चेतन मनेरिकर, मोहन पाटील, श्रीकांत इटगी, सुनील मद्दीमानी, सुंदर कुलकर्णी, प्रशांत लकेबैलकर, राहुल अळवणी, शिवराज लोकोळकर, कॉलेजचे प्रिन्सिपल दिलीप जवळकर, ए. बी. मुरगोड यांच्यासह शिक्षक वर्ग, विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
Belgaum Varta Belgaum Varta