खानापूर : २२ सप्टेंबर ते 7 ऑक्टोबरपर्यंत राज्यभरात जातनिहाय जनगणना सर्वेक्षण सुरू होणार असून खानापूर तालुक्यातील मराठा समाजाने स्वत:ची माहिती देतांना धर्म “हिंदू”, जात “मराठा”, उपजात “कुणबी” आणि मातृभाषा “मराठी” असा उल्लेख सर्व मराठा बांधवांनी करावा असे आवाहन खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी केले.
आज येथील शिवस्मारकात सकल मराठा समाजाची बैठक आयोजीत करण्यात आली होती. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जातनिहाय जनगणनेसाठी ६० प्रश्न विचारले जाणार आहेत, त्यात आर्थिक स्थितीपासून जात आणि इतर सर्व प्रकारची माहिती घेतली जाणार आहे. त्यात आपल्या मराठा समाजाला आरक्षण मिळविण्याच्या दृष्टीने जात जनगणतीवेळी जात “मराठा” आणि उपजात “कुणबी” तसेच भाषा “मराठी” असे नोंद करावे असे आवाहन त्यांनी केले.
मराठा जातीतील इतर प्रवर्गातील लोकांनीदेखील जात मराठा आणि उपजात नोंदवावी. त्यामुळे या भागात कोणत्या जातीचे आणि उपजातीचे लोक राहतात, याची माहिती सरकारला होईल, असे ते यावेळी म्हणाले.
म. ए. समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले. माजी आमदार दिगंबर पाटील, माजी आमदार अरविंद पाटील, क्षत्रिय मराठा परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप पवार, जेष्ठ नेते संजय कुबल, वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. आय.आर. घाडी, ॲड. अभिजीत सरदेसाई, ॲड. एच.एन. देसाई, सुरेश देसाई, विनायक मुतगेकर, दशरथ बनोशी, महेश पाटील, अनील पाटील यांची भाषणे झाली. यावेळी मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta